स्पष्टीकरण आल्यानंतरच इतर अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय

मुख्यमंत्र्यांची माहिती; जबाबदारांविरुद्ध होणार कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st January, 11:46 pm
स्पष्टीकरण आल्यानंतरच इतर अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ आग दुर्घटनेप्रकरणी सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणातील जबाबदार असलेल्या अग्निशमन दल, अबकारी, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि वीज खात्यासह विविध सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मिळालेल्या उत्तरानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

दंडाधिकारी चौकशी आणि निलंबन कारवाई

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दंडाधिकारी चौकशी समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईचे निर्देश दिले. अहवालातील ठपका गांभीर्याने घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून, आता मंडळातील आणखी दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

या खात्यांना नोटिसा

अहवालातील शिफारशींनुसार अग्निशमन दल, अबकारी, वीज खाते, अन्न व औषध प्रशासन (एफडीए), व्यावसायिक कर आणि पर्यटन खात्यातील परवाने देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नोटिसांना मिळणाऱ्या उत्तरांनंतर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जमिनीचा मालक फरार, लुथरा बंधू अटकेत

या प्रकरणातील जमिनीचा मुख्य मालक सुरिंदरकुमार खोसला सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हणजूण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, लुथरा बंधूंसह क्लबच्या काही अधिकाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. खोसला अटक झाल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

  • सुरक्षेचा अभाव : क्लबमध्ये आपत्कालीन निर्गमन मार्ग, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि आवश्यक सुविधांचा पूर्ण अभाव होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
  • कालबाह्य परवाना : १६ डिसेंबर २०२३ रोजी हडफडे-नागवा पंचायतने सुरिंदरकुमार खोसला याला दिलेला परवाना ३१ मार्च २०२४ रोजी संपुष्टात आला होता. त्याचे नूतनीकरण न करताच क्लब सुरू होता.
  • पाहणीविना परवाने : घर क्रमांक किंवा परवाना देताना सचिवांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली नाही. तसेच बेकायदेशीर बांधकाम असतानाही वीज व पाणी जोडणीसाठी ‘एनओसी’ देण्यात आली.

मालमत्तेचा इतिहास : मिठागरापासून क्लबपर्यंत

हडफडे येथील ही मालमत्ता सर्वे क्रमांक १५८/० आणि १५९/० अंतर्गत येत असून, ती पूर्वी मिठागर (सॉल्ट पॅन्स) क्षेत्रात होती.

कालावधी / वर्ष तपशील
१९८६-८८ सिल्वेरा कुटुंबाने ही जमीन अनिल व ख्रिस्टीन मडगावकर यांना विकली.
१९९५ मडगावकरांनी ती जमीन सुनील दिवकर व प्रदीप आमोणकर यांना हस्तांतरित केली.
१९९८-९९ पंचायत परवाने मिळाल्यानंतर येथे ‘मेजॉन’ हॉटेलचे बांधकाम झाले.
अलीकडचा काळ प्रदीप आमोणकर व सुनील दिवकर यांच्याशी करार करून सुरिंदरकुमार खोसला याने ही जागा ताब्यात घेतली आणि तिथे हा क्लब उभा राहिला.
#BirchClubFire #GoaGovernment #CMPramodSawant #IllegalConstruction #RomeoLane