पर्वरीत ६ जानेवारीला ‘लोकचळवळ’ची महत्त्वाची बैठक

विरोधकांचा एकमुखाने पाठिंबा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st January, 10:47 pm
पर्वरीत ६ जानेवारीला ‘लोकचळवळ’ची महत्त्वाची बैठक

पणजी : गोव्यातील शेती, पर्यावरण आणि येथील संस्कृती टिकवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी दिलेल्या ‘लोकचळवळी’च्या हाकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ६ जानेवारी रोजी पर्वरीत एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला स्वत: न्या. रिबेलो यांच्यासह राज्यातील अनेक बुद्धिजीवी आणि समविचारी नागरिक उपस्थित राहणार आहेत.

हरमलच्या लढ्यातून घेणार प्रेरणा

न्या. रिबेलो यांनी गोव्यातील वाढत्या जमिनीच्या विक्रीवर आणि रूपांतरणावर चिंता व्यक्त केली. जमीन रूपांतरणाविरोधात हरमलवासियांनी जो लढा उभारला आणि सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले, त्यातून गोवेकरांनी स्फूर्ती घेतली पाहिजे. माझ्या आवाहनाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत असून, ६ तारखेच्या बैठकीत या आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट होईल, असे रिबेलो यांनी सांगितले.

‘लोकचळवळी’च्या प्रमुख मागण्या

१. जमिनींचे घाऊक रूपांतरण आणि विक्री थांबवणे.
२. बेकायदेशीर डोंगर कापणीवर बंदी.
३. जमीन रूपांतरणाचे वादग्रस्त कायदे रद्द करणे.
४. गोमंतकियांना नोकऱ्यांत प्राधान्य.

विरोधी पक्षांचा संपूर्ण पाठिंबा

न्या. रिबेलो यांच्या या बिगरराजकीय आवाहनाला काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष (आप) आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) या सर्व विरोधी पक्षांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. आरजीचे आमदार विरेश बोरकर आणि वेंझी व्हिएगस यांनी याला पाठिंबा दर्शवला. विकासाच्या नावाखाली गोव्याची संस्कृती आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. न्या. रिबेलो यांची हाक योग्य असून, प्रत्येकाने साथ दिल्यास जनआंदोलन उभे राहण्यास वेळ लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसची लढ्यात उतरण्याची तयारी

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनीही या चळवळीला पाठींबा दिला. सीआरझेडचे उल्लंघन, डोंगर कापणी आणि मांडवीतील कॅसिनो हटवण्यासाठी जर जनआंदोलन उभे राहत असेल, तर काँग्रेस पक्ष ताकदीने या लढ्यात उतरेल, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

#SaveGoa #JusticeRebello #GoaMovement #LandConversion #GoaPolitics