नवीन वर्षात गोवेकरांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

४०० युनिटपेक्षा जास्त वापरासाठी मोजावे लागणार ६.२० रुपये

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st January, 11:02 pm
नवीन वर्षात गोवेकरांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

पणजी : महागाईने त्रस्त असलेल्या गोवेकरांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. वीज खात्याने डिसेंबर महिन्यापासून वाढीव वीज दर लागू करण्याचा निर्णय घेतल्याने, जानेवारीत हातात पडणारे वीज बिल वाढीव दराने येणार आहे. संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) पुढील पाच वर्षांसाठी (२०२५-२६ ते २०२९-३०) सरासरी ४ टक्के दरवाढीला मंजुरी दिली आहे.

घरगुती ग्राहकांसाठी नवे दरपत्रक

नवीन दरवाढीचा फटका घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांना बसणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी (कमी दाब) स्लॅबनुसार नवीन दर खालीलप्रमाणे असतील:

युनिट (स्लॅब) नवीन दर (प्रति युनिट)
० ते १०० युनिट १.९५ रुपये
१०१ ते २०० युनिट २.९० रुपये
२०१ ते ३०० युनिट ३.९० रुपये
३०१ ते ४०० युनिट ५.१५ रुपये
४०० युनिटपेक्षा जास्त ६.२० रुपये

सरासरी ४ टक्के वाढ मंजूर

वीज खात्याने २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ४.८ ते ५.९ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला होता, मात्र आयोगाने सरासरी ४ टक्के वाढ मंजूर केली. वीज पुरवठ्यासाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत भरून काढण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण वीज खात्याने दिले आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासूनच मंजूर झाली होती, मात्र त्याची अंमलबजावणी आता प्रभावीपणे बिलांत दिसणार आहे.

मीटर स्थलांतरला मुदतवाढ शक्य

घराच्या आत किंवा रीडिंग घेण्यास अडचणीच्या ठिकाणी असलेले मीटर बाहेर हलवण्याची मोहीम खात्याने हाती घेतली आहे. यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यात अशी सुमारे ४० हजार मीटर्स आहेत, पैकी केवळ १० हजार ग्राहकांनी जागा बदलण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे वीज खाते ग्राहकांना अतिरिक्त मुदत देण्याची शक्यता असून, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

#ElectricityBill #GoaNews #TariffHike #Inflation #PowerDepartment