लालबाबू दास याच्या खूनप्रकरणी बिहारमधून अनीश कुमार दासला अटक

न्यायालयाने ठोठावली चार दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd January, 11:38 pm
लालबाबू दास याच्या खूनप्रकरणी बिहारमधून अनीश कुमार दासला अटक

पणजी : आगशी परिसरात मूळ बिहार येथील लालबाबू दास याला क्षुल्लक कारणावरून विहिरीत ढकलून देण्यात आले. यात लालबाबू याचा मृत्यू झाल्यानंतर संशयित अनीश कुमार दास फरार झाला. आगशी पोलिसांनी बिहार येथून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लालबाबू दास याच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित अनीश कुमार दास (मूळ बिहार) याने लालबाबू याला २२ डिसेंबर २०२५ रोजी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने विहिरीत ढकलून दिले. त्यावेळी लालबाबू याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. लालबाबू याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच संशयित अनीश कुमार दास फरार झाला. दरम्यान, संशयित बिहार येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हृषिकेश रायकर यांच्या नेतृत्वाखाली कॉ. दीपसंतोष परवार, राजू अट्टार आणि संजय वरक या पथकाला बिहारमध्ये रवाना करण्यात आले. पथकाने विद्यापती पोलिसांच्या मदतीने संशयिताचा मूळ गावी शोध घेतला असता, तो तिथे नसल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने संशयित अनीश कुमार दास याचा मोबाईल व इतर माहिती घेऊन शोध घेतला असता, तो सिंगवारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने सिंगवारा पोलिसांची मदत घेत संशयित अनीश कुमार दास याच्या मुसक्या आवळल्या. तेथील न्यायालयाकडून हस्तांतरण रिमांडवर त्याला गोव्यात आणले. संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.