करमळी मधील मेगा प्रकल्पाची परवानगी मागे घ्यावी : आरजीपी

नगरनियोजन खात्यावर मोर्चा; तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
05th January, 03:17 pm
करमळी मधील मेगा प्रकल्पाची परवानगी मागे घ्यावी : आरजीपी

पणजी : गोव्यातील (Goa) करमळी (Karmali) येथे अवैध पद्धतीने एका मेगा बांधकाम प्रकल्पाला (Mega Construction Project) परवाने देण्यात आले आहेत. हा प्रकल्प स्थानिकांना नको आहे. नगर नियोजन खात्याने (Town and Country Planning Department) या प्रकल्पाची परवानगी मागे घ्यावी. जोपर्यंत परवानगी मागे घेतली जात नाही; तोपर्यंत खात्याच्या दारात आंदोलन सुरू राहील असा इशारा आमदार वीरेश बोरकर यांनी दिला. सोमवारी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बोरकर यांनी सांगितले की, करमळी मधील स्मशान भूमीजवळ या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ८४ फ्लॅट, जलतरण तलाव आणि ४६ गाळे असणार आहेत. गावात पाण्याची टंचाई असताना असा मोठा प्रकल्प नको; अशी मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी केली होती. याच्या विरोधात आम्ही याआधीही आंदोलन केले होते. तेव्हा मुख्य नगर नियोजकांनी प्रकल्पाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर वारंवार मागणी करून आम्हाला पाहणीचा अहवाल देण्यात आला नाही. 

खात्याने या प्रकल्पाला ६० मीटर बफर झोन दिला आहे. मात्र; याचे बांधकाम अगदी जागेच्या सीमेला टेकून सुरू आहे. प्रकल्पाच्या जवळच प्रसिद्ध करमळी तलाव आहे. प्रकल्पामुळे या तलावाला देखील धोका पोहोचण्याची शक्यता आहे. प्रकल्पामुळे भविष्यात येथील घरे, मैदान यांनाही धोका आहे. स्थानिक लोक मागील सहा महिने प्रकल्पाला विरोध करत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी, मंत्री मात्र शांत बसले आहेत असे बोरकर यांनी सांगितले.


हेही वाचा