
म्हापसा : गोव्यातील (Goa) तेलंगण नगर, खोर्ली- म्हापसा (Mapusa) येथील प्रमोद कर्पे यांच्या घराच्या (House) दुसऱ्या मजल्यावर आग लागून दीड लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली.
ही दुर्घटना आज मंगळवारी ६ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. कर्पे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक ‘शॉर्ट सर्किट’ होऊन आग लागली. यावेळी घराच्या खालच्या मजल्यावर कुटुंबीय होते. घराच्या छतावरून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. लगेच त्यांनी कर्पे कुटुंबियांना आरडाओरड करून माहिती दिली. तेव्हा त्यांनी धावपळ करीत मजल्यावर असलेल्या टाकीतील पाणी वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत टीव्ही संच, फर्निचर, काही व्यावसायिक दस्तावेज जळाले. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.