‘वंदे मातरम्’वर होणार अधिवेशनात चर्चा

पणजी : बर्च दुर्घटना, ढासळलेली कायदा सुव्यवस्था (Law and order), युनिटी मॉल (Unity Mall), मेगा प्रकल्पांना (Mega Project) दिलेले परवाने या विषयांवरून हिवाळी अधिवेशन (Winter session) गाजणार आहे. बर्च दुर्घटनेवर चर्चेची मागणी विरोधक करणार आहेत. सरकारतर्फे (Government) ‘वंदे मातरम्’वर १३ जानेवारी रोजी चर्चा होणार आहे.
अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. सभापती गणेश गावकर यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. बर्च दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू होणे ही गंभीर घटना आहे. महामहीम राज्यपालांनी अभिभाषणात याचा उल्लेख करायला हवा. बर्च दुर्घटनेसह कायदा सुव्यवस्था, युनीटी मॉल, जमीन विक्री हे मुद्दे विरोधक संयुक्तपणे उपस्थित करणार आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव बैठकीनंतर म्हणाले. विरोधकांना प्रश्न मांडण्याची पुरेशी संधी मिळायला हवी, अशी मागणी बैठकीत करण्यात आलेली आहे. अधिवेशनात १३ जानेवारी रोजी ‘वंदे मातरम्’वर चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.