पणजीत ९ ते ११ जानेवारी दरम्यान जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
06th January, 01:51 pm
पणजीत ९ ते ११ जानेवारी दरम्यान जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन

पणजी : जागतिक मराठी अकादमीतर्फे (Marathi Academy)  ९ ते ११ जानेवारी दरम्यान कला अकादमी (Kala Academy), पणजी (Panjim) येथे २१ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन पणजी येथील कला अकादमीमध्ये होणार आहे. गोवा राज्य आयोजन समितीचे सरचिटणीस अनिल सामंत यांनी ही माहिती दिली. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दशरथ परब, रमेश वंसकर, परेश प्रभु व अन्य उपस्थित होते. 

सामंत यांनी सांगितले की, यंदाच्या संमेलनात अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल काकोडकर (Dr. Anil Kakodkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. 

उद्घाटन सोहळा ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता होईल.  तर १० आणि ११ जानेवारी मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साहित्यिक, कलाकार, उद्योजकांचा समावेश असेल. संमेलनात पाहुणे म्हणून विदेशात काम करणाऱ्या गोमंतकीय व्यक्तींना बोलवण्यात येईल. तसेच स्थानिक गोमंतकीय तसेच मराठीसाठी काम करणाऱ्या देशभरातील मान्यवर मार्गदर्शन करतील. ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेण्यात येईल. २.४५ वाजता लक्ष्मीची पावले, ४ वाजता चक्री भजन, ५.१५ वाजता नांदी तर ७.३० वाजता ‘मर्मबंधातील ठेव’ ही या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

१० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गोव्यातील कवींचे संमेलन होणार आहे. ९.३० वाजता दिग्दर्शक आदित्य जांभळे यांची मुलाखत, सकाळी १० वाजता विदेशातील मान्यवर व्यक्तींचे अनुभव कथन यांचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ६.३० वाजता चित्र शिल्प काव्य कार्यक्रम तर ७.३० वाजता ‘पालशेतची विहीर नाटक’ असणार आहे. रविवार ११ रोजी ९.३० ते ४ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता समारोप सोहळा असून; त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत होईल. या संमेलनामुळे गोव्यात मराठीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. यामुळे गोव्यात मराठीला नवी ऊर्जा मिळून नव्या साहित्यिकांना प्रेरणा मिळणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा