प्रादेशिक आराखडा वापरा, कॅसिनो हटवा!

पणजी : गोव्यात (Goa) प्रादेशिक आराखड्याचा (Regional Plan) वापर करावा आणि मांडवी नदीतील (Mandovi River) कॅसिनो (Casino) त्वरित हटवावे, या प्रमुख मागण्यांसाठी पणजीत ‘गोव्याच्या संरक्षणासाठी’ आयोजित सभेत मंगळवारी जनसागर लोटला. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही सभा आयोजित केली होती. मात्र, सभेला नागरिकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की सभागृह अपुरे पडले. त्यामुळे जवळच असलेल्या आझाद मैदानावर स्क्रीन लावून लोकांची सभा पाहण्याची व्यवस्था करावी लागली. तिथेही मोठी गर्दी जमली होती.
प्रादेशिक आराखडा हाच पर्याय
ॲड. नॉर्मा अल्वारीस यांनी आपल्या भाषणात जमिनीच्या प्रश्नावर लक्ष वेधले. प्रादेशिक आराखडा डावलून आणि नगर नियोजन कायद्यात बदल करून जमिनींचे रूपांतरण सुरू आहे. केवळ पैशांसाठी जमिनी रूपांतरीत केल्या जात आहेत. प्रादेशिक आराखडा २०२१ त्वरित मार्गी लावावा, कारण तोच सुशासनासाठी एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचार आणि कॅसिनोंवर प्रहार
निवृत्त न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांच्या अध्यक्षतेखालील या सभेत स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नाईक देसाई, उस्मान खान पठाण, रवींद्र वेळीप यांची भाषणे झाली. रोहिदास नाईक देसाई यांनी गोव्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि मांडवीतील कॅसिनोंबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ तियात्रिस्त तोमाझिन कार्दोज यांनी पत्नीसह ‘गोवा वाचवण्यासाठी’ विशेष कांतार सादर केले.