
इटलीतील एका शहराला प्रदूषणाच्या विळख्यात ढकलणारी आणि हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळणारी यंत्रसामग्री आता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर दाखल झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत एका केमिकल प्लांटमध्ये ही यंत्रसामग्री बसवण्यात आल्याची माहिती समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणाची पाळेमुळे इटलीतील विसेन्झा भागातील 'मितेनी' नावाच्या कंपनीशी जोडलेली आहेत. ही कंपनी फ्लोरोकेमिकल्स उत्पादनासाठी ओळखली जात होती. मात्र, २०११ मध्ये झालेल्या एका संशोधनात धक्कादायक वास्तव समोर आले. या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील जमीन आणि पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले होते. विशेषतः पीएफएस (फॉरेव्हर केमिकल्स) या घातक रसायनांमुळे सुमारे ३.५ लाख लोकांना कर्करोग, हृदयविकार आणि यकृताचे गंभीर आजार जडले होते. या भीषण प्रदूषणामुळे २०१८ मध्ये ही कंपनी कायमची बंद करण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली.
आता हीच जुनी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान लिलावाद्वारे 'लक्ष्मी ऑरगॅनिक' या कंपनीच्या उपकंपनीने विकत घेतले आहे. २०२३ मध्ये ही यंत्रसामग्री मुंबई बंदरामार्गे लोटे परशुराम येथे आणली गेली आणि २०२५ पासून तिथे उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे. इटलीत ज्या यंत्रांनी हाहाकार माजवला, तीच यंत्रे आता कोकणात वापरली जात असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पीएफएससारखी रसायने निसर्गात कधीही नष्ट होत नाहीत, ती मानवी शरीरात साचून राहतात आणि प्रजनन क्षमतेसह रोगप्रतिकारशक्तीवर घातक परिणाम करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या गंभीर विषयाची दखल घेत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सध्या तिथे पीएफएसचे उत्पादन होत नसल्याचे सांगण्यात आले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे, कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये आपले सर्व कामकाज नियमांनुसार सुरू असून पर्यावरणात कोणतेही घातक सांडपाणी सोडले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. इटलीसारखी भयानक परिस्थिती रत्नागिरीत उद्भवू नये, यासाठी आता प्रशासकीय तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- ऋषभ एकावडे