मुस्ताफिझूर प्रकरण : केवळ केकेआरला लक्ष्य का?

Story: क्रीडारंग - क्रिकेट |
06th January, 12:09 am
मुस्ताफिझूर प्रकरण : केवळ केकेआरला लक्ष्य का?

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान याला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघात सामील केल्याने मोठा वाद निर्माण झाला. सुरुवातीला केकेआर आणि संघाचा मालक शाहरुख खान यांच्यावर चौफेर टीका झाली. मात्र, बीसीसीआयने मुस्ताफिझूरला रिलीज करण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला. मात्र या वादामागील वास्तव समोर येणे गरजेचे आहे.

भारत–बांगलादेश दरम्यान सध्या राजकीय आणि सामाजिक पातळीवर तणावपूर्ण वातावरण आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू सहभागी होऊ नयेत, असा दबाव निर्माण झाला.

अशा परिस्थितीत केकेआरने मुस्ताफिझूर रहमानला आपल्या ताफ्यात घेतल्याने सोशल मीडियावर तसेच काही राजकीय वर्तुळात संघावर जोरदार टीका झाली. या टीकेचा रोख प्रामुख्याने शाहरुख खान यांच्याकडे वळवण्यात आला. मात्र, वस्तुस्थिती पाहता हा आरोप एकतर्फी होता.

महत्त्वाची बाब म्हणजे मुस्ताफिझूर रहमानला आयपीएल लिलावात उतरवण्याचा निर्णय हा सर्वस्वी बीसीसीआयचा होता. त्यामुळे याबाबत बीसीसीआयला जाब विचारणे आवश्यक होते. कोणताही खेळाडू लिलावात येतो, तेव्हा सर्व फ्रँचायझींना त्याच्यावर बोली लावण्याचा समान अधिकार असतो. विशेष म्हणजे, मुस्ताफिझूरवर पहिली बोली चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) लावली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली आणि अखेरीस केकेआरने सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. म्हणजेच, हा निर्णय केवळ केकेआरचा नव्हता, तर या निर्णयामागे बीसीसीआय आणि संपूर्ण आयपीएल व्यवस्थापन  होते. त्यामुळे फक्त केकेआर किंवा शाहरुख खान यांनाच लक्ष्य करणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे.

जनभावना आणि वाढता राजकीय तणाव लक्षात घेता बीसीसीआयने केकेआरला मुस्ताफिझूर रहमानला रिलीज करण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन करत केकेआरने तातडीने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि मुस्ताफिझूरला संघातून मुक्त केल्याचे जाहीर केले. यासाठी अनेकजण बीसीसीआयचे अभिनंदन करत आहेत, जे हास्यास्पद वाटते.

मात्र या संपूर्ण वादाचा परिणाम केवळ आयपीएलपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि भारत–बांगलादेश संबंधांवरही उमटले. या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मोठा निर्णय घेतला. पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात सामने खेळण्यास बांगलादेशने नकार दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आयसीसीकडे गेले आहे. बांगलादेशने आयसीसीकडे अधिकृतपणे विनंती केली आहे की, त्यांचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करण्यात यावेत. त्यामुळे मुस्ताफिझूर रहमान प्रकरण हे केवळ एका खेळाडूच्या निवडीपुरते मर्यादित राहिले नसून, क्रिकेट, राजकारण, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्या गुंतागुंतीच्या छेदनबिंदूवर उभे आहे. या संपूर्ण प्रकरणात केवळ केकेआर किंवा शाहरुख खान यांनाच दोष देणे योग्य ठरणार नाही. वास्तविक पाहता, लिलाव प्रक्रिया, बीसीसीआयचे निर्णय आणि बदलती राजकीय परिस्थिती या सर्व घटकांनी मिळून हा वाद निर्माण झाला आहे.


- प्रवीण साठे, लेखक दै गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत