साऊथ स्टॅलियन्स ठरला ‘मनोहर धोंड स्मृती’ बॅडमिंटन चषक विजेता

बीपीएस आर्मी उपविजेता : पणजीत ज्युनियर लीगचा थरार

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 mins ago
साऊथ स्टॅलियन्स ठरला ‘मनोहर धोंड स्मृती’ बॅडमिंटन चषक विजेता

पणजी : सुधन्वा उडुपाच्या नेतृत्वाखालील साऊथ स्टॅलियन्स संघाने ‘स्व. मनोहर धोंड स्मृती ऑल स्टार्स कप २०२५’ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. काम्पाल, पणजी येथील इनडोअर स्टेडियमवर पार पडलेल्या या ज्युनियर लीग चॅम्पियनशिपमध्ये स्पर्श कोलवाळकरचा बीपीएस आर्मी संघ उपविजेता ठरला. धोंड्स स्पोर्ट्स क्लब आणि पणजी स्मॅशर्स क्लबने गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये गोव्यातील सर्वोत्तम उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंनी सहभाग नोंदवला.

स्विस लीग फॉरमॅटमध्ये चुरस

स्पर्धेत १० फ्रँचायझी संघांनी सहभाग घेतला. यामध्ये अॅशर्स स्मॅशर्स, बॅडमिनेटर्स, बीपीएस आर्मी, चिखली टायगर्स, धोंड्स डेअरडेव्हिल्स, नॉर्थ नाईट्स, पणजी स्मॅशर्स, शटल किंग्स, साऊथ स्टॅलियन्स आणि स्पार्कलिंग स्टार्स यांचा समावेश होता. ही स्पर्धा आगळ्यावेगळ्या ‘स्विस लीग’ फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली. स्पर्धेत अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळाले. अव्वल चार संघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले, त्यामुळे अंतिम क्रमवारी जिंकलेल्या आणि हरलेल्या गेम्सच्या फरकावरून निश्चित करण्यात आली. सात दुहेरी सामन्यांच्या या फॉरमॅटमध्ये बहुतेक निकाल ४-३ अशा फरकाने लागले, ज्यामुळे शेवटच्या शटलपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढली.

चिखली टायगर्स तिसऱ्या स्थानी

शिवम प्रभू देसाईच्या नेतृत्वाखालील चिखली टायगर्सने तिसरे स्थान पटकावले. यात कोमल कोठारी ‘गर्ल आयकॉन’ होती. तर शौर्य नाईकच्या नेतृत्वाखालील शटल किंग्सने चौथे स्थान मिळवले, त्यांच्या संघात अनाया कामत ‘गर्ल आयकॉन’ होती. बक्षीस वितरण सोहळ्याला प्रवर्तक हर्षद धोंड, गौरीश धोंड, जीबीएचे खजिनदार संजय भोबे, माजी सचिव संदीप हेबळे आणि जीबीएचे प्रशिक्षक विनायक कामत उपस्थित होते.

अंतिम विजेते आणि उपविजेते संघ

विजेता : साऊथ स्टॅलियन्स उपविजेता : बीपीएस आर्मी
कर्णधार: सुधन्वा उडुपा
अर्णव रामनाथकर, अतिंद्र गावकर, अयांश संके, गोविंदराज देसाई, हर्षित चारी, मिहरान शेख, निवृत्ती कापोलकर, पलक रामनाथकर, पिहू रेडकर, प्रतिक नाईक बोरकर, राज धुमे, वर्धा कायसुलकर आणि वीर फळदेसाई.
कर्णधार: स्पर्श कोलवाळकर
आरव रुपेश शिरोडकर, आश्मन धायमोडकर, आयुष नाईक, के. चरण सिद्धार्थ, लक्ष स्वामी, मलक मुल्लाम, प्रज्ञा अवदी, प्रत्युष पाटील, प्रियांश देसाई, सांभवी भारद्वाज, वरुण सहकारी, विहान नाईक आणि यतीन देवडिगा.

‘गर्ल आयकॉन’ विशेष पुरस्कार

संघ खेळाडू
साऊथ स्टॅलियन्स पलक रामनाथकर
बीपीएस आर्मी प्रज्ञा अवदी
चिखली टायगर्स कोमल कोठारी
शटल किंग्स अनाया कामत
#BadmintonGoa #SouthStallions #ManoharDhondCup #SportsNews #GoaSports