रणजी। गोव्याच्या विशाल लक्ष्याला नागालँडचे सडेतोड उत्तर

पाहुण्यांना विजयासाठी १९४ धावांची गरज; ९ गडी शिल्लक

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th October, 10:11 pm
रणजी। गोव्याच्या विशाल लक्ष्याला नागालँडचे सडेतोड उत्तर

पणजी : रणजी चषक प्लेट गटात यजमान गोवा विरुद्ध नागालँड सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. नागालँडला चौथ्या व अखेरच्या दिवशी विजयासाठी १९४ धावांची गरज आहे तर गोव्याला विजयाचे पूर्ण गुण मिळवण्यासाठी ९ गडी बाद करण्याची आवश्यकता आहे.      

नागालँडसमोर गोव्याने विजयासाठी तब्बल ३३८ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते, मात्र नागालँडने पहिल्या डावातील निराशाजनक कामगिरी मागे टाकत दुसऱ्या डावात जबरदस्त खेळी करताना दिवसभरात केवळ १ गडी गमावून १४५ धावा फलकावर लगावल्या. या डावात त्यांचा सलामीवर सेदेझाली रुपेरोने ४८ तर देगा निश्चलने नाबाद ७६ धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा देगासोबत हेम छेत्री १२ धावा करून नाबाद आहे.      

तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी गोव्याने ५ बाद १७७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावून नाबाद असलेला स्नेहल कवठणकर तिसऱ्या दिवशी आपल्या डावाचे मोठ्या खेळीत रुपांतर करू शकला नाही व कालच्या धावसंख्येत १९ धावांची भर घालत बाद झाला. कर्णधार दर्शन मिसाळनेही या डावात ३० धावांची खेळी करताना गोव्याला मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तळात अर्जुन तेंडुलकरने शानदार खेळी करत गोव्याला मोठी आघाडी मिळवून देण्यात यश मिळवले. अर्जुनने ३९ चेंडूंच्या आपल्या खेळीत २ चौकार व ३ षटकार ठोकाताना ४२ धावा केल्या. अर्जुन जॉनथनच्या गोलंदाजीत यष्टिचित झाला. अशा प्रकारे गोव्याने ९१.१ षटकांत सर्वगडी गमावून ३०६ धावा बोर्डावर लावताना पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पाहुण्या नागालँडसमोर ३३८ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले.      

मोठ्या लक्ष्यामुळे नागालँडचा डाव तिसऱ्या दिवशी कोसळेल अशी गोव्याची अपेक्षा होती मात्र नागालँडच्या सलामीवीरांनी दाखवलेल्या जबरदस्त प्रदर्शनामुळे गोव्याच्या सर्व आशांवर पाणी फेरले. नागालँडतर्फे दोन्ही सलामीवीरांनी गोव्याच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देत शतकी भागीदारी केली. आपल्या अर्धशतकापासून केवळ दोन धावा दूर असताना रुपेरोला दर्शन मिसाळने बाद करत ही भागीदारी तोडली. गोव्याला पहिले यश एकूण ११९ धावांवर मिळाले. यानंतर देगाने अर्धशतक लगावताना हेम छेत्रीसोबत मिळून नागालँडला अधिक धक्के बसू दिले नाही व दिवसाचा खेळ संपेपर्यत दोघांनी किल्ला लढवला. गोव्याला सामना जिंकण्यासाठी अजून दोन गडी बाद करायचे आहेत तर नागालँडला विजय नोंदवण्यासाठी १९४ धावांची गरज आहे. 

बंगालसाठी इशानचे ५ बळी

कोलकातामध्ये, बंगालचा वेगवान गोलंदाज इशान पोरेलने ८३ धावांत पाच बळी घेतले. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच विकेट घेण्याची त्याची पाचवी कामगिरी आहे, ज्यामुळे केरळची धावसंख्या पाच बाद ८३ धावा झाली. मात्र, केरळच्या मधल्या फळीच्या जोरावर त्यांनी सात बाद २६७ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी जलज सक्सेनाने १६२ चेंडूंत ८४ धावा केल्या तर सलमान निझारने ६४ धावांची खेळी केली. या दोघांनी बंगालच्या गोलंदाजांना निराश केले आणि सातव्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली.