तब्बल १८ ब्रँड्सचा समावेश असलेला, सुमारे ५ लाख रुपयांचा १५२ लीटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
बंगळुरू : गोव्यात उपलब्ध असलेली दारू स्वस्त असल्याने देशी पर्यटकांत ती विशेष लोकप्रिय आहे. याच कारणास्तव अनेकदा गोवा निर्मित दारूची गैरमार्गाने तस्करी केली जाते. दरम्यान असाच एक प्रकार समोर आला आहे. गलोरच्या कत्रिगुप्पे परिसरात एका घरात छापेमारी करत कर्नाटक अबकारी विभागाने पांच लाख रुपयांचा गोवा निर्मित दारू साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पुरुषोत्तम यास अटक करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम बंगळुरूत बसची वाट पाहत उभा असताना रुटीन चेकअप दरम्यान काही अधिकाऱ्यांना त्याचा संशय आला. त्याची चौकशी केली असता पुरुषोत्तम गोंधळला. त्याच्या सामानाची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना फक्त गोव्यात विकण्यास परवानगी असलेल्या काही दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेंगलोर कत्रीगुप्पे येथील त्याच्या घराची झडती घेतली असता, विविध १८ ब्रॅण्ड्सचा समावेश असलेला १५२ लिटर दारूचा साठा सापडला. बाजारभावानुसार यांची किंमत सुमारे ५ लाख रुपयांच्या आसपास आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम गोव्यातील हॉलसेल दारू विक्रेत्यांशी संपर्क साधून बंगळुरूत येणाऱ्या आंतरराज्यीय बसेसच्या माध्यमातून गोवा निर्मित दारू मागवत असे. गाड्या येताच पुरुषोत्तम यातील दारू घेऊन ती आपल्या घरी साठवत असे. याची विक्री तो स्थानिकांना चढ्या दराने करायचा. अधिकाऱ्यांनी त्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात गोव्यातील अनेक दारू विक्रेत्यांचे क्रमांक आढळून आले. सोबतच आतापर्यंत झालेल्या डीलची बिले देखील सापडली. दरम्यान त्याच्याविरुद्ध अबकारी कायदा १९६५ च्या कलम ११, १४ , १५ , ३८(A), ३४(A) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अबकारी अधिकारी पुढील तपास करीत आहेत.