मालिकेत १-१ अशी बरोबरी; राधाची अष्टपैलू खेळी व्यर्थ
अहमदाबाद : न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ७६ धावांनी पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी हा सामना झाला.
न्यूझीलंडने आधी भारतीय पुरुष संघाचा आणि आता महिला संघाचा पराभव केला आहे. टीम इंडियाविरुद्धच्या या विजयानंतर महिला एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. भारताकडून राधा यादवने ४८ धावांची चांगली खेळी केली. मात्र तिला विजय मिळवून देता आला नाही.
महिला टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची पहिली विकेट स्मृती मानधनाच्या रूपाने पडली. तिला खातेही उघडता आले नाही. शेफाली वर्माही बाद झाली. तिने ११ धावा केल्या. यास्तिका भाटिया १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूंचा सामना करत २४ धावा केल्या. तिने १ चौकार आणि १ षटकार मारला. जेमिमाह रॉड्रिग्ज १७ धावा करून बाद झाली तर तेजल हसबनीस १५ धावा करून बाद झाली.
सायमा-राधाची सर्वोत्तम भागीदारी
टीम इंडियाने १०८ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या. पण यानंतर सायमा ठाकोर आणि राधा यादव यांच्यात उत्कृष्ट भागीदारी झाली. राधा आणि सायमाने ७० धावांची भागीदारी केली. यादरम्यान सायमाने ५४ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. तिने ३ चौकार मारले.