पंजाब किंग्सचा राजस्थानला धक्का

५ गड्यांनी पराभव : सॅम करनची अष्टपैलू कामगिरी, अर्धशतकासह घेतले २ बळी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th May, 12:07 am
पंजाब किंग्सचा राजस्थानला धक्का

गुवाहाटी : आयपीएलच्या १७ व्या मोसमातील ६५ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला विजयासाठी १४५ धावांचे आव्हान दिले हाेते. पंजाबने हा सामना ५ गडी राखून जिंकला. कर्णधार सॅम करने कप्तानी खेळी करत नाबाद ६३ धावा केल्या आणि २ गडीसुद्धा बाद केले. या विजयाने गुण तालिकेत मोठा फेरबदल झाला नसला तरी प्ले ऑफ अखेरीस हे गमावलले गुण राजस्थानला महागात पडू शकतात.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने २० षटकांत ९ विकेट्स गमावून १४४ धावा केल्या. राजस्थानकडून रियान पराग याने सर्वाधिक धावा केल्या. रियानने केलेल्या ४८ धावांच्या खेळीमुळे राजस्थानला १४० पार मजल मारता आली.
रियान पराग याने ३३ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने आणि १४१.१८ च्या स्ट्राईक रेटने ४८ धावा केल्या. आर अश्विन याने १४७.३७ च्या स्ट्राईक रेटने १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २८ धावांचे योगदान दिले. ओपनर जॉस बटलरन याच्या जागी संधी मिळालेल्या टॉम कोहलर-कॅडमोर याने १८ धावा केल्या. कॅप्टन संजू सॅमसन याने १५ चेंडूत ३ चौकारांसह १८ धावा जोडल्या. तर इतर फलंदाजांना काही खास करता आले नाही. पंजाबकडून राहुल चहर, हर्षल पटेल आणि कॅप्टन सॅम करन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर अर्शदीप सिंह आणि नॅथन एलिस यांच्या खात्यात प्रत्येकी १ विकेट गेली.राजस्थानला सलग दुसऱ्यांदा १५० पार मजल मारता आलेली नाही. राजस्थानचा पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध १२ मे रोजी आमनासामना झाला होता. राजस्थानने या सामन्यात २० षटकांत ५ गडी गमावून १४१ धावांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे राजस्थानचे फलंदाज कुठेतरी कमी पडत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबच्या संघाने हे आव्हान १८.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पंजाबतर्फे कर्णधार सॅम करनने सर्वाधिक ६३ धावा केल्या. रायली रुसो आणि जितेश शर्माने प्रत्येकी २२ धावांचे योगदान दिले. तर आशुतोष शर्माने सामन्याच्या अखेरीस फटकेबाजी करत ११ चेंडूत १७ धावा केल्या. राजस्थानतर्फे आवेश खानने २८ धावांत तर युझवेंद्र चहलने ३१ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्टने २७ धावांत १ गडी बाद केला. पंजाब जरी स्पर्धेतून बाहेर झाले असलेतरी प्ले ऑफचे गणित बिघडविण्याची संधी पंजाबला आहे. पंजाबचा अखेरचा सामना हैदराबादशी रविवारी १९ रोजी दु.३.३० वाजता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्यात जर पंजाब पुन्हा विजयी ठरला तर बंगळूरू आणि दिल्लीला प्ले ऑफची संधी उपलब्ध होऊ शकते.
संजूचा विक्रम
सध्याच्या मोसमात संजू चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने राजस्थानसाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. त्याचा फॉर्म पाहता त्याला २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. संजूने आयपीएल २०२४ मध्ये ५०० धावांचा आकडा गाठला आहे. एका हंगामात राजस्थानसाठी मोठी धावसंख्या रचणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याशिवाय २०१८ नंतर एका हंगामात ५०० अधिक धावा करणारा सॅमसन हा जोस बटलरनंतर दुसरा य़ष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. संजू सॅमसनला पंजाब किंग्जविरुद्ध मोठी खेळी खेळता आली नाही. पण या सामन्यात १० धावा केल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. संजू सॅमसनआधी सुरेश रैनाने ही कामगिरी केली होती. रैनाने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ४९३४ धावा केल्या आहेत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २८१५ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
सुरेश रैना- ४९३४ धावा
संजू सॅमसन- ३००८ धावा
विराट कोहली- २८१५ धावा
एबी डिव्हिलियर्स- २१८८ धावा
मनीष पांडे- १९४२ धावा

हेही वाचा