मुंबईसाठी उगवला विजयाचा ‘सूर्य’

सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव : तिलक वर्माची मिळाली साथ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th May, 12:02 am
मुंबईसाठी उगवला विजयाचा ‘सूर्य’

मुंबई : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा १६ चेंडू बाकी असताना ७ गडी राखून पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या १४३ धावांच्या भागीदारीमुळे मुंबईला विजयाची नोंद करण्यात यश आले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. मुंबईने २६ धावांच्या स्कोअरवर एक गडी गमावला होता, पण पुढच्या ५ धावांत ३ गडी गमावले. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादवने केल्या. त्याने ५१ चेंडूत १०२ धावा केल्या. त्याने तिलक वर्मासोबत १४३ धावांची भागीदारी केली. त्याने ३७ धावा केल्या. चेंडू खेळपट्टीवर अडकत होता, त्यामुळे १७४ धावांचे लक्ष्य खूप मोठे वाटत होते. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये ३ गडी गमावून ५२ धावा केल्या होत्या. 

एमआयचा विजय एकतर्फी ठरला कारण संघाला १८ चेंडूंत फक्त ७ धावा हव्या होत्या. सूर्यकुमार यादवने १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत मुंबईचा ७ गडी राखून विजय निश्चित केला.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ८ विकेट गमावत १७३ धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर पॅट कमिन्स ३५ धावा करून नाबाद राहिला. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोज यांना प्रत्येकी १ यश मिळाले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर हैदराबादला पहिला धक्का ५६ धावांवर अभिषेक शर्माच्या रूपाने बसला. जसप्रीत बुमराहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अंशुल कंबोजने ६८ धावांवर हैदराबादला दुसरा धक्का दिला. अंशुल कंबोजने मयंक अग्रवालला आपला शिकार बनवले. मयंक ५ धावा करून माघारी परतला.

यानंतर ट्रॅव्हिस हेडला पियुष चावलाने बाद केले. ३० चेंडूंत ४८ धावा करून हेड आऊट झाला त्यानंतर हार्दिक पांड्याने नितीश रेड्डीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नितीश रेड्डीने १५ चेंडूंत २० धावा केल्या. तर हेन्रिक क्लासेन अवघ्या २ धावा करून पियुष चावलाचा बळी ठरला. मार्को जॅनसेन १७, शाहबाज अहमद १० आणि अब्दुल समद ३ धावा करून बाद झाले. सरतेशेवटी कर्णधार पॅट कमिन्सच्या १७ चेंडूत ३५ धावांच्या खेळीने हैदराबादला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.