उष्णतेचा पर्यटन व्यवसायाला फटका; केरळमध्ये ४० टक्क्यांनी घटले पर्यटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 10:54 am
उष्णतेचा पर्यटन व्यवसायाला फटका; केरळमध्ये ४० टक्क्यांनी घटले पर्यटक

कोची : केरळमध्ये एप्रिल महिन्यापासून कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यातच येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. उष्णतेमुळे पर्यटकांनी केरळकडे पाठ फिरवली आहे. या काळात दरवर्षी सरासरी जितके पर्यटक येतात त्यात यंदा ४० टक्क्यांनी घट झाल्याचे आढळून आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सध्या तापमान ४० अंशांपेक्षा जास्त आहे, जे सामान्य तापमानापेक्षा ४ ते ५ अंशांनी अधिक आहे. एक दिवस आधी, पलक्कड येथे ४१.८ अंश तापमान नोंदवले गेले होते, जे गेल्या १०० वर्षांतील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे. विभागानुसार २०१६ मध्ये हे तापमान ४१.९ इतके नोंदवले गेले होते.

आता केरळमध्ये ज्याप्रकारे उष्मा वाढत आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय केरळच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. उष्णतेमुळे राज्यातील पर्यटन टक्केवारी ४० टक्क्यांनी घसरली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक आता येथे येण्यास तयार नाहीत. वायनाड आणि मुन्नारसारखे सुंदर भाग सध्या पर्यटकांअभावी ओसाड पडले आहेत. अशा परिस्थितीत केरळमधील लोकही राज्यातील पर्यटनस्थळे सोडून डोंगराळ राज्यांतील पर्यटनस्थळांना आपली पहिली पसंती देत ​​आहेत. केरळचे लोक शिमला आणि दार्जिलिंगला भेट देणार आहेत, एका अहवालानुसार, २०२३ मध्ये २.१८ कोटी देशी पर्यटक केरळला पोहोचले होते, जे २०२२ च्या तुलनेत १५.९२% जास्त होते. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे उलट आहे.

इतर राज्यांचा पर्यटन व्यवसाय

हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. काल येथे ४४ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. अशा स्थितीत उष्णतेचा परिणाम येथील पर्यटनावरही होण्याची शक्यता आहे. मात्र, उष्मा पाहता डोंगराळ राज्यांमध्ये पर्यटन वाढू शकते.

हेही वाचा