
मुलांनो, तुमच्या कधी लक्षात आलंय का की हिवाळा आला की आपली भूक अचानक वाढते, आणि सारखं काहीतरी खावंसं वाटतं? असं का होत असेल बरं?
याचं उत्तर आहे - आपल्या पोटातील 'अग्नी'.
अग्नी म्हणजे काय?
शरीरातला 'अग्नी' म्हणजे आपली पचनशक्ती. जसं गॅसची ज्योत मोठी असेल तर पाणी पटकन उकळतं किंवा भात, भाजी पटकन शिजते, तसंच आपली पचनशक्ती तीक्ष्ण असेल तर आपण खाल्लेलं अन्न पटकन पचतं आणि लगेच परत भूक लागते.
हिवाळ्यात शरीरातील अग्नी का वाढतो?
हिवाळ्यात बाहेर वातावरणात खूप थंडी असते. तेव्हा आपलं शरीर उष्णता टिकवून ठेवण्यासाठी पोटातील अग्नीची ताकद वाढवतं. आणि त्यामुळेच अन्न लवकर पचतं, म्हणून आपल्याला जास्त भूक लागते.
मग ही भूक भागवण्यासाठी हिवाळ्यात काय खावे?
१) उष्ण आणि ताजं अन्न : गरम गरम भात, आमटी, मूगडाळ-तांदळाची खिचडी, गरमागरम चपाती किंवा भाकरी, त्यावर साजूक तूप आणि आपल्या आवडीची भाजी किंवा उसळ, वेगवेगळ्या प्रकारचे घरी तयार केलेले सूप, कुळथाची पिठी, डोसा, इडली, पोहे, मेदू वडा, धिरडे, थालिपीठ
२) गोड व पौष्टिक पदार्थ : वेगवेगळ्या प्रकारचे हलवे - उदा. गाजर हलवा, केळ्याचा हलवा, कोहळ्याचा हलवा. मुरंबा - आवळ्याचा, आवळा कँडी. खोबऱ्याची वडी, कोहळ्याची वडी. अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, गाईचे गरम दूध, साजूक तूप, हळद व सुंठ घालून प्यावे.
३) हिवाळ्यातील फळं आणि भाज्या : बोरं, डाळिंब, पपई, पडवळ, गाजर, मेथी, मटार
हिवाळ्यात काय टाळावे?
थंड पेय - फ्रीजमधील पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स, सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, उघड्यावरील पदार्थ
एसीचा वापर
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात आपलं आरोग्य खूप चांगलं होतं, त्यामुळे आजार दूर पळतात. हिवाळ्यात पौष्टिक आहार आणि भरपूर व्यायाम करून आपण शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढवू शकतो. तिळाचं तेल लावून शरीराची मालिश सुद्धा करावी आणि सकाळच्या सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवावा. हिवाळ्याचा आनंद घ्या आणि निरोगी राहा.

वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य