कधीकधी मनात एक आवाज कुजबुजतो, 'माझंच कुठेतरी चुकत असावं'. पण हा तुमचा दोष नाही. शब्दांच्या सावलीत लपलेल्या 'भावनिक अत्याचारा'ला ओळखणे म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणे होय.

कधी कधी घरातल्या गोंगाटात, गॅलरीत टांगलेल्या कपड्यांतून येणाऱ्या वाऱ्यात, किंवा चहाच्या कपातून उठणाऱ्या वाफेतही, आपण स्वतःलाच हरवून बसल्याचं जाणवतं. जसं की, घरातला पंखा फिरत राहतो, दिवस जातात, आणि आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत गुंतलेले असतो. परंतु आपल्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी एक आवाज सतत कुजबुजत राहतो, “बहुदा माझंच कुठेतरी चुकत असावं...”
कारण, मनावर ओरखडे असतात, कोणीही पाहू न शकलेले. आणि भावनिक अत्याचाराचं हेच ते न दिसणारं गणित होय. तो रोज-रोज, थेंबाथेंबाने मनात साचत गेलेला असतो. जणू एखाद्या छोट्याशा भेगेतून सुरू झालेला पाण्याचा प्रवाह जो एक दिवस घराचा पाया हलवून टाकतो आणि कुणालाच कधी कळत नाही नेमका तो क्षण कोणता होता.
भावनिक अत्याचार म्हणजे नेमकं काय?
भावनिक अत्याचार म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या भावनांचा वापर करून नियंत्रित करणं, त्याला लाजवणं, कमी लेखणं व अपराधी वाटण्यास भाग पाडणं. उदाहरणार्थ, कधी कौतुकाच्या नावाखाली शाब्दिक चिमटे, तर कधी काळजीच्या नावाखाली नियंत्रण करणे. कधी हेटाळणीच्या विनोदांतून, कधी “तुझ्यामुळेच सगळं होतं!” अशा स्पष्ट दोषारोपातून, तर कधी अनभिज्ञपणे केलेलं मॅनिप्युलेशन अर्थात ‘मी म्हटलं म्हणून’ चालणारा कसला तरी राजेशाही हुकूम.
भावनिक अत्याचार झालेली व्यक्ती अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारत राहते, “हे खरंच योग्य आहे का?” “मीच जास्त रिअॅक्ट करतेय का?” अशा प्रश्नांच्या सावल्या जणू पीडित व्यक्तीचं अस्तित्वच गिळायला लागतात आणि अक्षरश: त्यांना रोज तुकड्या तुकड्याने पोखरत जातात.
त्यामुळे, सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्याचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, आणि स्वतःबद्दलची जाणीव उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलेली शब्दांची, वागणुकीची, व भावनांची यंत्रणा म्हणजेच हा भावनिक अत्याचार किंवा छळ. ह्यात स्त्री-पुरुष असा भेदभावही नसतो. हा अत्याचार सगळ्यांना समान असतो.
मानसशास्त्र सांगतं की अशा छळामागे भावनिक वर्चस्व किंवा पॉवर असते, आणि त्या पॉवरला टिकवणं हा छळ करणाऱ्यांचा एकमेव उद्देश असतो. परंतु पीडित व्यक्ती मात्र स्वतःलाच दोष देत राहते.
या अत्याचारामुळे मनावर उमटणारे अदृश्य ठसे
भावनिक छळ हा एकाच प्रसंगाने बनलेला नसतो; तो अनेक छोट्या छोट्या कटू अनुभवांतून निर्माण झालेला एक राक्षस असतो. त्यामुळे अशा अत्याचारानंतर पीडित व्यक्तीमध्ये अनेक लक्षणं उमटतात, जसे की, डोक्यात अविरत फिरणाऱ्या दुष्ट आठवणींचा गुंता, दुःस्वप्नं, अनिद्रा, मन अकारण भीतीनं दडपून जाणे, परिचित चेहऱ्यातही धोका दिसू लागणे आणि सर्वात घातक म्हणजे आपली ही घुसमट कुणालाच दिसत नाहीये, ही एक असह्य एकाकी भावना मनात निर्माण होणे.
खरंतर, आपल्या समाजात भावनिक अत्याचाराला नावच नसतं. कारण तिथे रक्त दिसत नाही, ओरखडे कळत नाहीत. फक्त मन रक्तबंबाळ झालेलं असतं आणि आपणही ‘हे काही फार मोठं नाही’ म्हणून स्वतःलाच समजावत बसतो व दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो.
याला गॅसलाइटिंग असंही म्हटलं जातं, जो ह्या भावनिक अत्याचाराच्या दुष्टचक्राचा एक भाग आहे. त्यात समोरचा माणूस आपल्या भावनांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपल्यालाच शाब्दिक भ्रमात टाकतो. मग आपल्याच आत्मविश्वासाला ह्याचा फटका बसतो ज्यात आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो; स्वतःलाच पटवून देतो की, “कदाचित मीच जास्त विचार करतेय/करतोय..” आणि हळूहळू स्वतःच्याच मनाचे कैदी बनतो.
यासाठी, भावनिक अत्याचार ओळखणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं होय! कारण छळाला नाव दिलं की आपल्या मनाला सुद्धा एक मोकळी वाट मिळते. आणि मन मोकळं झालं की मार्गही दिसतो. कधीकधी सीमारेषा आखण्याचा, कधीकधी नातं पुनर्रचनेचा, आणि कधीकधी धाडसानं बाहेर पडण्याचा.
एक समुपदेशक म्हणून मी अनेकांना हेच सांगते की, तुमच्या भावना खऱ्या आहेत, तुमच्या मानसिक जखमा वास्तविक आहेत, आणि त्या समजून घेणं हा गुन्हा नाही हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे.
लक्षात असू द्या, आपल्या समाजात अजूनही अत्याचार म्हटलं की शरीरावरच्या जखमांचीच कल्पना केली जाते. पण भावनिक अत्याचार? तो इतका निश्चल, इतका निःशब्द असतो की तो आपल्या नात्यातच घुसून बसतो जणू काही हेच नॉर्मल आहे.
मात्र, यावर उत्तर आहे. जाणीव. जाणीव की, ही चूक तुमची नाही. जाणीव की, भावनिक सुरक्षितता हा लक्झरी नव्हे, गरज आहे. जाणीव की, मर्यादा आखणे म्हणजे नातं तोडणं नव्हे, तर स्वतःला जोडणं आहे.
तर, या गोष्टीचा शेवट? तो तुम्ही लिहायचा आहे. तुमचं मन पुन्हा उभं करायचं आहे. तुमचा आवाज परत मिळवायचा आहे. आणि त्या न दिसणाऱ्या जखमांना नाव द्यायचं आहे की, “होय, हा अत्याचार होता.”

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४