जोधपूर निफ्टच्या नावलौकिकात राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमुळे भर

संस्थेत गोव्यातील विद्यार्थीही घेतात फॅशन डिझाइनचे धडे

Story: उमेश झर्मेकर । गोवन वार्ता |
17 mins ago
जोधपूर निफ्टच्या नावलौकिकात राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमुळे भर

जोधपूर : राजस्थान (Rajsthan) मधील जोधपूरस्थित राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने (निफ्ट) (National Fashion Technology Institute) आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघाची जर्सी आणि क्रीडा किट डिझाइन केले आहे.

याशिवाय नवीन संसद भवनात मार्शलचे गणवेश तयार करण्याची मान्यता मिळाल्याने या संस्थेच्या नावलौकीकात भर पडली आहे. देशभरातील विद्यार्थी इथे फॅशनचे शिक्षण घेत असून, गोव्यातील दोघांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या पेहरावातूनच संस्थेला फॅशनचा खरा माहोल मिळाला आहे.

जोधपूर नॅशनल इन्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीचे (एनआयएफटी) संचालक जी.एच.एस. प्रसाद यांनी सांगितले की, संस्थेच्या प्राध्यापकांच्या पथकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघासाठी जर्सीची डिझाइन केली होती, ज्यामुळे राज्याचा राजेशाही वारसा अधोरेखित झाला.

केंद्र सरकार समर्पित या संस्थेच्या कॅम्पसमध्ये व्यवस्थापनाकडून अभिमानाने जर्सी प्रदर्शित केली जाते, जी संस्थेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवते. या प्रतिष्ठित प्रकल्पांचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रसाद यांनी सांगितले.

संसद मार्शलच्या गणवेशाने भारतीयतेची भावना निर्माण केली; तर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीने फॅशन आणि क्रिकेट वर्तुळात लक्ष वेधले आहे, असे प्रसाद म्हणाले.

निफ्टच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. आदिती मेर्टिया म्हणाल्या की, हा क्रिकेट प्रकल्प राजस्थान रॉयल्सच्या थेट दृष्टीकोनातून संस्थेकडे पोहोचला होता. ज्यांना अशी जर्सी हवी होती, जी केवळ संघाच्या आत्म्याला मूर्त स्वरूप देत नाही तर राजस्थान राजाच्या वारशाचा स्पर्श देखील घेऊन जाते.

 राजस्थान रॉयल्सला एनआयएफटीला सर्जनशील प्रक्रियेचा भाग बनवायचा होता. त्यांनी आम्हाला व्यापक कल्पना दिल्या. त्यापैकी एक चित्तोडगडच्या विजय स्तंभाशी संबंधित होती व आम्हाला त्या थीम भोवती काम करण्यास सांगितले.

तीन प्राध्यापक आणि 11 विद्यार्थी यांच्या पथकाने अनेक महिले काम केले आणि अंतिम स्वरूपापर्यंत मजल मारली. या पथकाने सुमारे शंभर डिझाइनची पुनरावृत्ती केल्यामुळे सर्जनशीलता अचूकतेची भेट दिली, असे त्या म्हणाल्या.

आमच्या सतत बैठका झाल्या.  शिवाय नमुने तपासण्यासाठी संघाने आमच्या कॅम्पसलाही भेट दिली. खेळाडूंच्या किटसह सर्व काही अंतिम करण्यासाठी तीन ते चार महिने सहकार्याचे प्रयत्न झाले. या पथकामध्ये क्रिकेटचे अनुसरण करणारे काहीजण होते, असे डॉ. मेर्टिया म्हणाल्या.      

२५० महिलांना प्रशिक्षण

बाडमेर, जैसलमेर, जोधपूर जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेली कुटूंबे राहतात. त्यातील कलागुण ओळखून सुमारे 250 महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी फॅशन डियाझनिंगचे प्रशिक्षण निफ्ट जोधपूरने दिले.

त्यांना रोजगार मिळवून देण्याच्या योगदानाबरोबरच फॅशन डिझाइनचे इतरही अनेक उपक्रम त्यांच्याद्वारे राबवण्यात येत आहेत. प्रशिक्षणामुळे या महिला आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह उत्तमपणे चालवत आहेत, अशी माहिती डॉ. आदिती मेर्टिया यांनी दिली.


हेही वाचा