साळगाव दुहेरी खून प्रकरणातील संशयित पसारच

जगन्नाथ भगतला पकडण्यासाठी चार पथके राज्याबाहेर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
साळगाव दुहेरी खून प्रकरणातील संशयित पसारच

म्हापसा : मुड्डोवाडा साळगाव येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपी जगन्नाथ भगत (रा. छत्तीसगड) हा घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप सापडलेला नाही. गोव्यासह बिहार, छत्तीसगड, मुंबई, बंगळुरू या ठिकाणी संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.

गुरुवार, दि. ६ रोजी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. भाड्याच्या खोलीमध्ये रिचर्ड आगासिओ डिमेलो (रा. गिरी बार्देश) व अभिषेक उर्फ सोनू गुप्ता (रा. इंदोर मध्यप्रदेश) या दोघांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. मालक रिचर्ड याचा गळा चिरण्यापूर्वी संशयिताने त्यांच्या डोक्यावर स्वयंपाकासाठी वापरला जाणाऱ्या कूकरने हल्ला केला होता.

हा दुहेरी खून केल्यानंतर संशयित आरोपी जगन्नाथ हा मालक रिचर्ड यांचीच स्कुटर घेऊन पसार झाला. प्रथम थिवी रेल्वे स्थानक त्याने गाठले. मात्र, रेल्वे तिकीट मिळाले नसल्याने तो तिथेच दुचाकी टाकून बसमार्गे म्हापशाला आला. तिथून करमळी रेल्वे स्थानकावर गेला. तिथेही त्याला घरी जाण्यासाठी रेल्वे तिकीट मिळाले नाही. त्यानंतर संशयित लिफ्ट घेऊन मडगावला गेला. तिथे एका बारमध्ये त्याने दारू प्राशन केली. खून केल्यावर दुचाकी, बस, लिफ्ट मागत तसेच मोटारसायकल पायलटमार्फत त्याने साळगाव ते मडगाव पर्यंत प्रवास केला असल्याचे पोलीस चौकशीतून उघडकीस आले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

दक्षिण गोव्यातही संशयिताचा शोध

संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके मुंबई, बंगळुरू, बिहार, छत्तीसगडमध्ये रवाना झाली आहेत. मात्र, अद्याप या पथकांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. शिवाय संशयिताने घटनेनंतर पलायनासाठी वापरलेली शक्कल ही गुंगारा देण्यासाठी असावी, या शक्यतेने पोलीस मडगाव व दक्षिण गोव्यातील इतर भागात संशयिताचा शोध घेत आहेत.