कुंकळ्ळी पोलिसांची कारवाई : गाडीसह लाखोंचा मद्यसाठा जप्त

मडगाव : कुंकळ्ळी पोलिसांनी गोव्याबाहेर बेकायदेशीररित्या मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोव्याबाहेर मद्य नेण्यासाठी उभा केलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दारुच्या वाहतुकीसाठी कर्नाटकातून भाड्याने घेतलेल्या ट्रकचा वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रकबाबत गाडीमालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तो तपासणीसाठी ताब्यात घेतला. तपासात या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मद्यसाठा लपवून ठेवलेला असल्याचे आढळून आले. सदर मद्यसाठा गोव्याबाहेर नेण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, पोलिसांकडून सुरू असलेल्या सततच्या कारवाईमुळे गाडीत माल भरण्यात आला असला तरी तो राज्याबाहेर नेता आला नव्हता. त्यामुळे हा ट्रक औद्योगिक वसाहतीत उभाच ठेवण्यात आला होता.
दरम्यान, सदरचा ट्रक हा कर्नाटकातील तुमकूर येथील बी. सी. महालिंगा यांच्या मालकीचा आहे. त्यांच्याकडून रमेश कुमार प्रजापत यांनी भाड्याने हा ट्रक दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, ट्रकचे भाडेही दिलेले नाही व ट्रक घेतलेल्या व्यक्तीकडून कॉल्सही घेण्यात येत नव्हते. यामुळे गाडीमालकाने जीपीएसच्या माध्यमातून लोकेशन ट्रॅक केले असता कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत ट्रक असल्याचे दिसून आले. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या गाडीतून बेकायदा मद्यसाठा वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाईसाठी मुद्देमाल अबकारी खात्याच्या ताब्यात दिला जाणार आहे. या कारवाईमुळे गोव्यातून बेकायदेशीर मद्य वाहतुकीच्या रॅकेटचा आणखी एक मोठा पर्दाफाश झाला आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणात पुढील चौकशी सुरू केली असून, यामागील संपूर्ण साखळी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
व्यवस्थापक संशयाच्या भोवऱ्यात
कुंकळ्ळी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात गाडी भाड्याने घेण्यात आलेल्या प्रजापत यांचा व्यवस्थापक या प्रकरणात गुंतल्याचे समोर आले आहे. सध्या तो बेळगाव कर्नाटकात आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.