सावर्डे-धारबांदोडा झेडपी निवडणूक; भाजपमध्ये रस्सीखेच

सावर्डे एसटीसाठी राखीव, तर धारबांदोडा सर्वसाधारण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November, 11:41 pm
सावर्डे-धारबांदोडा झेडपी निवडणूक; भाजपमध्ये रस्सीखेच

धारबांदोडा : दक्षिण गोव्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीची आरक्षणे निश्चित झाल्यामुळे आता सावर्डे आणि धारबांदोडा या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सावर्डे जिल्हा मतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, तर धारबांदोडा मतदारसंघ जनरल (सर्वसाधारण) झाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली सहा हजार मते दुर्लक्षित करून चालणार नाहीत. त्यामुळे यंदा खरी स्पर्धा भाजपच्याच इच्छुकांमधून असेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
सावर्डेत एसटीचे मोहन गावकर प्रबळ दावेदार
सावर्डे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी मोहन गावकर हे एसटी समाजातून प्रबळ दावेदार आहेत. ते सभापती गणेश गावकर यांचे कट्टर समर्थक असल्याने, त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचे पारडे जड राहील. मात्र, काँग्रेस, ‘आप’, गोवा फॉरवर्ड आणि आरजी (रिव्होल्युशनरी गोवन्स) या पक्षांची युती झाल्यास चित्र बदलू शकते. तरीही, भाजप आपल्या कार्यकर्त्यांना कसे एकसंघ ठेवते, यावर मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे.
धारबांदोडात भाजपमध्ये अनेक इच्छुक
धारबांदोडा मतदारसंघ जनरल झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. साकोर्डा पंचायतीचे विद्यमान पंच आणि माजी सरपंच शिरीष देसाई यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय सावर्डे मंडळाचे महासचिव रूपेश देसाई, पंच महादेव शेटकर आणि गौतम सावंत हे देखील इच्छूक आहेत. हे सर्व उमेदवार साकोर्डा पंचायत क्षेत्रातील आहेत.
कुळे-शिगाव पंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र देसाई आणि धारबांदोडा पंचायतीचे माजी सरपंच विनायक गावस यांचेही नाव स्पर्धेत आहे. माजी जिल्हा सदस्य गोविंद गावकर यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.
भाजपला दोन्ही जिल्हा मतदारसंघात विजय मिळवायचा असल्यास, सर्व इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होणे आवश्यक आहे. यासाठी सभापती गणेश गावकर यांच्यासह विनय तेंडुलकर यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
बंडखोरीची भीती; आरजीचे प्राबल्य
* शिरीष देसाई यांना उमेदवारी न मिळाल्यास रूपेश देसाई हा चांगला पर्याय ठरू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपच्या सर्व इच्छुकांनी एकमेकांशी असलेले मतभेद विसरून काम करणे आवश्यक आहे. योग्य व्यक्तीला उमेदवारी न दिल्यास मतदारसंघात मोठी बंडाळी माजू शकते.
* या मतदारसंघात आरजी पक्षाचेही प्राबल्य आहे. आरजीचे कार्यकर्ते विपिन नाईक यांनी मागील विधानसभा निवडणुकीत सुमारे २ हजार मते मिळवली होती. त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.      

हेही वाचा