पालकत्व सिद्ध करण्यासाठी एक दिवसाची मुदत

काणकोण : गोवा-कर्नाटक सीमेवरील पोळे-लोलये गावात दत्तक मुलाला अमानुष मारहाण केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार २ नोव्हेंबर रोजी समोर आला होता. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय बालकावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून (गोमेकॉ) शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले. बाल कल्याण समितीच्या निर्देशानुसार, आता या बालकाला पुढील काळजीसाठी काणकोण पोलिसांनी 'अपना घर' या निवारागृहात पाठवले आहे.
आईने केलेल्या या मारहाणीमुळे बालकाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. विशेषतः, कपाळावर आणि डाव्या गालावर मोठी जखम झाली होती, गालावरील जखमेतून छिद्र पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. बालकावर गोमेकॉमध्ये दोन महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, आता त्याची तब्येत स्थिर आहे.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. संशयित महिलेने हा मुलगा बेकायदेशीररित्या दत्तक घेतला होता. यामागे कर्नाटकमधील एका एजंटचा समावेश असून, तो मानवी तस्करी करतो आणि लहान मुलांची बेकायदेशीर विक्री करतो, असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. काणकोण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मुलाचे पालकत्व आणि मानवी तस्करीच्या मोठ्या नेटवर्कची शक्यता पडताळून पाहत आहेत.
पोलिसांकडून डीएनए चाचणीची मागणी
या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिला अजून अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी आईला तिचे पालकत्व सिद्ध करण्यासाठी फक्त एक दिवसाची मुदत दिली आहे. हा मुलगा तिचाच आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी जनुकीय चाचणी म्हणजेच डीएनए चाचणी करावी लागेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेतले असल्यास, त्यासंबंधीची वैध कागदपत्रे सादर करण्याची मागणीही पोलिसांनी केली आहे.