सप्टेंबर,ऑक्टोबरमध्ये ही टाकल्या होत्या धाडी

पणजी : गोव्यातील (Goa) कॅसिनो (Casino) आणि रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रांमध्ये सक्तवसुली संचालनालय (ईडी) चे (ED) धाडसत्र, तपास सुरूच आहे. ज्यामध्ये अलिकडच्या काळात लक्षणीय जप्ती आणि कथित बेकायदेशीर परकीय चलन व्यवहार आणि पैशांच्या हस्तांतरणाची चौकशी करण्यात आली आहे.
काल शुक्रवारी ईडीच्या दिल्ली विभागाने गोव्यातील कॅसिनो व रिअल इस्टेटशी निगडित कंपनीच्या मालकांवर बांबोळी, दोनापावलासह दिल्ली व इतर राज्यांत धाडी टाकल्या. त्यानंतर पुन्हा एकदा धाडसत्राची चर्चा सुरू झाली आहे. गोव्यात सप्टेंबर,ऑक्टोबरमध्ये ही धाडी टाकल्या होत्या.
काल शुक्रवारी टाकण्यात आलेल्या धाडी ‘फेमा’अंतर्गत (Fema) करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी पहाटे ईडीच्या दिल्ली विभागाच्या पथकाने प्रथम कॅसिनो व रिअल इस्टेटशी निगडित कंपनीच्या मालकावर दोनापावला येथील बंगल्यावर छापा टाकला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली.
त्यानंतर बांबोळी येथील बंगल्यावर छापा टाकला. कारवाईत ईडीने मोठ्या प्रमाणात विदेशी चलनांसह दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याची माहिती आहे.
ईडीच्या अलिकडच्या गोव्यातील धाडी
सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस, ईडीने गोव्यातील कॅसिनोसहीत दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि राजकोट येथे धाड टाकली होती. त्यात बिग डॅडी कॅसिनो आणि त्याच्या मूळ कंपन्या, गोल्डन ग्लोब हॉटेल्स आणि वर्ल्डवाइड रिसॉर्ट्स यांचा समावेश होता. त्यात ईडीने २.२५ कोटी रोख, ८.५० लाख किंमतीचे परकीय चलन (१४,००० अमेरिकन डॉलर्ससह) जप्त केले होते. ९० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या क्रिप्टोकरन्सी (प्रामुख्याने USDT) गोठवण्याची घोषणा केली होती.
कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे देखील जप्त करण्यात आले होते. मात्र, बिग डॅडी कॅसिनोतर्फे धाडीत काहीच जप्त केले नसल्याचा दावा केला होता.
ईडीच्या तपासात असे उघड झाले होते की, पोकर चिप्सची कथितपणे परकीय चलनासाठी देवाणघेवाण केली जात होती. आणि जिंकलेले पैसे परकीय चलनात दिले जात होते. त्यामुळे परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या तरतुदींचे उल्लंघन झाले.
कॅसिनो कर्मचारी परवाना नसलेल्या ऑनलाइन जुगार प्लॅटफॉर्मचा प्रचार करत असल्याचे आणि परदेशात, विशेषतः दुबईमध्ये निधी पाठवण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्स आणि "अंगाडिया" (अनौपचारिक मनी ट्रान्सफर) सेवांचा वापर करत असल्याचे आढळून आल्याची माहिती पुढे आले होते. कॅसिनो ग्रुपने त्यांच्या मालमत्तेतून कोणताही बेकायदेशीर निधी जप्त केल्याचा इन्कार केला होता.
रिअल इस्टेट घोटाळे
जमीन घोटाळ्याची चौकशी: ऑक्टोबर २०२५ मध्ये, ईडीने हणजुणा आणि इतर ठिकाणी बनावट मालकी हक्काच्या कागदपत्रांसह सुरू असलेल्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या संदर्भात गोवा, नवी दिल्ली आणि चंदीगडमध्ये पुढील शोध मोहिमा राबवल्या होत्या.
ईडीने ऑक्टोबरच्या छाप्यांमध्ये कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त केले होते व अंदाजे १.५ लाख (USDT) असलेले क्रिप्टो वॉलेट्स गोठवले होते.
जमीन हडप प्रकरणात पूर्वीच्या कारवाईनंतर ईडीने गोव्यातील बिल्डर यशवंत सावंत याच्याकडून सात लक्झरी कार आणि ७२ लाख रोख जप्त केले होते. याप्रकरणी एप्रिलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ईडीचे गोव्यात एका बाजूला धाडसत्र सुरू आहे तर यापूर्वी टाकलेल्या धाडीतून मिळालेल्या कागदपत्रांची, बेकायदेशीर व्यवहारांची तपासणी सुरू आहे. त्यातून मिळालेल्या माहितीवरून आणखी धाडी टाकण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशांतर्गत आणि परदेशी ऑपरेटर्सशी संबंधीत तपास ही सुरू आहे.