मच्छीमारांनी गाठला किनारा

पणजी : साळ नदीच्या (Sal River) मुखावरील वाळूच्या पट्ट्यांची समस्या कायम आहे. वाळूच्या पट्ट्यांमुळे कुटबण (Cutbona fishing Jetty) जेटीवरून मासेमारी करण्यासाठी जात असलेल्या बोटींचे अपघात होत आहेत. गुरुवारीही मासेमारी करून येणारी बोट वाळूच्या पट्ट्यांना (Sand bar) धडकल्याने अडकून पडली. मात्र, सुदैवाने बोटीवर असलेल्या मच्छीमारांनी पोहून किनारा गाठला.
काही मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार, मासेमारी करून बोट कुटबण जेटीवर येत होती. त्यावेळी वाळूच्या पट्ट्यांना धडकून तेथेच अडकून पडले. यापू्र्वीही अशा घटना घडल्या आहेत. साळ नदीच्या मुखावरील वाळूच्या पट्ट्यांची समस्या सोडवण्यासाठी मच्छीमार व बोट मालकांनी त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली होती. मात्र, पर्यावरण मंजुरी न मिळाल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी, मत्स्यव्यवसाय विभागाने साळ नदीच्या मुखावर संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाकडे या प्रकल्पाला आव्हान दिल्यानंतर काम स्थगित ठेवण्यात आले. हरित लवादाने पर्यावरण दाखला घेऊन काम पुढे नेण्यास सूचित केले होते. मात्र, ते पुढे जाऊ शकले नाही.