वाळवंटी नदीपात्रात नौकानयनाचा देदीप्यमान सोहळा

त्रिपुरासुराचा प्रतिकात्मक वध : आकर्षक सरंग्यांची गगनझेप, महोत्सवाला नागरिकांची अलोट गर्दी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
3 hours ago
वाळवंटी नदीपात्रात नौकानयनाचा देदीप्यमान सोहळा

साखळी : त्रिपुरारी पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात विठ्ठलापूर साखळीच्या वाळवंटी नदीत विहरणाऱ्या एकापेक्षा एक अशा आकर्षक नौकांनी वाळवंटीचे पात्र खुलूनच गेले. नदीपात्रातील रंगमंचावर दशावतारी कलाकारांकडून त्रिपुरासुराचा वध हा भाग सादर झाला. त्यानंतर त्रिपुरासुराच्या प्रतिकृतीचा बाण मारून वध व दारूकामाची आतषबाजी करण्यात आली.
कला व सांस्कृतिक खाते, पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ, माहिती व प्रसिद्धी खाते, दीपावली उत्सव समिती विठ्ठलापूर-साखळी व विठ्ठल-रखुमाई देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलापूर-साखळी येथे आयोजित राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व नौकानयन सोहळा लक्षवेधी ठरला. एकूण ३० नौका या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. सोहळ्याला हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
श्रीकृष्ण मिरवणुकीने सोहळ्याला प्रारंभ झाला. महिलांनी वाळवंटीत दीपदान केल्याने वाळवंटीचे पात्र दिव्यांच्या प्रकाशाने खुलून निघाले. रात्री ८ वा. पासून विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात नौकानयन स्पर्धेतील नौका दखल झाल्या होत्या. रात्री विठ्ठल-रखुमाईची पालखी वाळवंटी किनारी दाखल होताच त्रिपुरासुर वधाचा भाग सुरू झाला. त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर वाळवंटीच्या पात्रात एकापेक्षा एक अशा आकर्षक नौकांचा विहार सुरू झाला. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘सरंगे’ आकाशाच्या दिशेने झेप घेत होते.
या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच लक्ष्मण गुरव, पंच तन्वी सावंत, बिंदीया सावंत, दत्तप्रसाद खारकांडे, नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, संचालक विवेक नाईक, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र जोगळे, देवस्थानचे अध्यक्ष उदयसिंह राणे व इतरांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्याम गावकर, वैदेही पित्रे यांनी केले.
उत्सवांना सरकारचा सदैव आधार : मुख्यमंत्री
गोव्यातील उत्सवांना सरकार नेहमीच आधार देत आले आहे. या उत्सवाला राज्य दर्जा दिला असून, त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. नौकानयन स्पर्धेच्या निमित्ताने या भागातील युवक उत्कृष्ट जहाजबांधणी करू शकतात, हे सिद्ध होत आहे. युवकांनी भविष्यात नावीन्यपूर्णता, तंत्रज्ञान व संशोधन या तीन निकषांवर जास्त भर देत काम केल्यास त्याचा फायदा विकसित भारत आणि विकसित गोव्यासाठी होईल, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.      

हेही वाचा