पालिका-पंचायत कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण

पणजी : गोवा सरकारने आता कचरा व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. नगरपालिका आणि पंचायत कर्मचारी तसेच इतर संबंधितांना कचरा व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान देण्यासाठी खास तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डीएसडीई यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याला मान्यता देण्यात आली आहे.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. घरोघरी कचरा संकलित करणाऱ्या एजन्सींची संख्या वाढवण्याचा निर्णय कचरा व्यवस्थापन महामंडळाने घेतला आहे. शिक्षण संस्थांमधील कचरा संकलित करून तो पाच पद्धतीने वेगळा केला जाईल. सरकारी कार्यालयांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी डिस्पेंसर्स आणि इन्सिनीरेटर्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
घातक कचऱ्याची लावणार विल्हेवाट
या बैठकीत कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील सनराईज झिंकचा घातक कचरा काढण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच या घातक कचऱ्याची पिसुर्ले येथील प्रकल्पात विल्हेवाट लावली जाईल. साळगाव आणि ताळगाव येथे ओल्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था केली जाईल. पेट बॉटल्स रिसायकल करण्यासाठी स्थानिक संस्थांच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.