दक्षिण गोव्यात आतापर्यंत ३,३२१ वन हक्क दावे निकाली

प्रलंबित साडेतीन हजार प्रकरणांवर वेगाने काम सुरू : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
दक्षिण गोव्यात आतापर्यंत ३,३२१ वन हक्क दावे निकाली

दक्षिण जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलताना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस. सोबत अधिकारी

मडगाव : दक्षिण गोव्यात आतापर्यंत वन हक्क कायदा, २००६ अंतर्गत एकूण ३,३२१ दावे निकाली काढण्यात आले आहेत. अजूनही सुमारे साडेतीन हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांचा निपटारा लवकर करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी, सीमांकन व समित्यांच्या बैठका घेण्यावर भर दिला जात आहे.
राज्य सरकारकडून वन हक्क कायद्याअंतर्गत सनद देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी वन हक्क दावे निकाली काढण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजनही केले होते. आता तालुकास्तरावरील समितीकडून प्राप्त झालेल्या दाव्यांवर जिल्हा समितीकडून तत्काळ निर्णय घेत दावे निकाली काढण्यावर भर दिला जात आहे.
फोंडा तालुक्यातील उपविभागीय पातळी समितीकडून वन हक्क कायदा, २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यात फोंडा तालुक्यातील बोरी, उसगाव, गांजे आणि शिरोडा या गावांतील एकूण २८ दावे निकाली काढण्यात आले होते. तर गुरुवारी काणकोण तालुक्यातील उपविभागीय पातळी समितीकडून वन हक्क कायदा, २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या दाव्यांवर निर्णय घेण्यात आला.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी क्लिटस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काणकोण तालुक्यातील खोतीगाव, खोला आणि श्रीस्थळ या गावांतील एकूण ४०९ दावे निकाली काढण्यात आले आहेत. आतापर्यंत दक्षिण गोव्यातील विविध तालुक्यांतील एकूण ३,३२१ प्रकरणांवर निर्णय घेत दावे निकाली काढण्यात आले असून अद्यापही सुमारे साडेतीन हजार प्रकरणांवर प्रक्रिया सुरू आहे, असे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी सांगितले.      

हेही वाचा