पालिका प्रशासनाने बजावली कारणे दाखवा नोटिस

मुरगाव: मुरगाव पालिकेने (MMC) सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडला (IOCL) जोरदार दणका दिला आहे. पालिकेच्या जागेचे भाडे म्हणजेच 'लीज रेंट' न भरल्याबद्दल एमएमसीने इंडियन ऑईलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही थकबाकी तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये इतकी मोठी आहे.

एमएमसीचे मुख्य अधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी जारी केलेल्या या नोटिशीनुसार, इंडियन ऑईल कंपनीला ही थकबाकी भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत ही ८,५०,३७,८२९ (आठ कोटी पन्नास लाख सदतीस हजार आठशे एकोणतीस रुपये) रक्कम न भरल्यास किंवा समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास, The Goa Public Premises (Eviction of Unauthorised Occupants) Act, 1988 अंतर्गत कंपनीवर कार्यवाही सुरू करण्याचा इशारा नगर पालिकेने दिला आहे.

सातत्याने दुर्लक्ष
पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑईलच्या ताब्यातील जागेच्या भाड्याची ही थकबाकी आहे. या थकबाकीबाबत २१ जुलै २०२५ रोजी एमएमसीने इंडियन ऑईलसोबत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर २२ जुलै आणि पुन्हा १४ ऑगस्ट रोजी पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच, ८ सप्टेंबर रोजीही कंपनीला उत्तर पाठवण्यात आले होते. मात्र, या सातत्याने झालेल्या पत्रव्यवहारानंतरही कंपनीकडून कोणतीही रक्कम जमा झाली नाही किंवा ठोस प्रतिसाद मिळाला नाही.

महसूल वसुलीसाठी कारवाई
नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की, हा कारवाईचा भाग महसूल वाढवण्यासाठी आहे. विविध आस्थापनांकडून अनेक वर्षांपासूनची प्रलंबित थकबाकी वसूल करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. ही नोटीस इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) वास्को टर्मिनल व्यवस्थापकांना पाठवण्यात आली असून, त्यासोबत थकबाकीच्या रकमेचा तपशीलवार अहवाल देखील जोडण्यात आला आहे.