रस्ते दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना निर्देश : मंत्री कामत

म्हणाले- कामे मंजूर झालेल्या रस्त्यांवर थेट हॉटमिक्सिंग करणार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
रस्ते दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना निर्देश : मंत्री कामत

मडगाव: काही ठिकाणी रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामे मंजूर झालेली आहेत. परंतु, त्याठिकाणी पावसामुळे कामे करता आली नाही. त्यामुळे, आता त्याठिकाणी थेट हॉटमिक्सिंग करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले आहे. उद्यापासूनच रस्ता दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. १ नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांची डागडुजी केली जाईल, असे मंत्री कामत यांच्याकडून सांगण्यात आलेले होते. याबाबत विचारणा केली असता, मंत्री कामत यांनी सांगितले की, अनेक रस्त्यांची कामे मंजूर झालेली असून पावसामुळे त्यांची कामे हाती घेता आलेली नाहीत. पावसाचा कालावधी पाहता आज पावसाचा शेवटचा दिवस असू शकतो. उद्यापासून पाऊस पडणार नाही, असे आपण गृहीत धरतो. हॉटमिक्सिंगच्या प्लांट्सची सुरुवात आता झालेली आहे, त्यामुळे त्यांनी कामांना वेग आवश्यक गती मिळाली आहे. आज पावसाची शक्यता दाखवली जात असून उद्यापासून रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात येईल. हॉटमिक्सिंगचे प्लांट्स याआधी सुरू करण्यात आलेले होते पण पावसामुळे ते पुन्हा बंद करण्याची वेळ आली. या कामांसाठी 'डेडलाइन' अशी काही दिलेली नाही; पण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढे करण्यास सांगितले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करावे. एकाच वेळी चार ते पाच कंत्राटदारांकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

मडगाव रवींद्र भवनात इफ्फीचे स्थळ म्हणून चिन्हांकित करण्याबाबत विचारणा केली असता, मंत्री कामत यांनी सांगितले की, याआधी रवींद्र भवनाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात आलेले होते. विहित वेळेत ती कामे करण्यावर लक्ष होते व ती कामे पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर आता इफ्फीसाठी पुढील प्रक्रिया करण्याबाबत विचार केला जाईल. त्यांची तांत्रिक समितीची पाहणी व इतर अनेक प्रक्रिया असतात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा