बागा-हडफडे येथे दोन आस्थापनांतील सात जणांना अटक, पोलीस तपास सुरू

पणजी : उत्तर गोव्याच्या किनारपट्टी भागात पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बागा आणि हडफडे येथे दोन आस्थापनांच्या एलईडी बोर्डवर 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहिलेले आढळल्याने मोठी खळबळ उडाली. सोशल मिडियावर यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच कळंगुट आणि हणजूण पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरुवातीला दोन व नंतर चार जणांना अटक केली. दोन्ही एलईडी बोर्ड त्वरित बंद केले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा ही आक्षेपार्ह घटना उघडकीस आली. त्यानंतर या परिसरात तणाव वाढला होता.
बागा आणि हडफडे परिसरात ही दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत:
सर्वप्रथम बागा येथील 'रिवायव्ह हेअर कटिंग सलून' (Revive Hair cutting salon) या आस्थापनेच्या एलईडी बोर्डवर आक्षेपार्ह संदेश दिसला. त्यानंतर असाच प्रकार हडफडेत असलेल्या 'व्हिस्की पीडिया' (Whiskey Pedia) या दुकानाच्या एलईडी बोर्डवरही 'पाकिस्तान झिंदाबाद' हा संदेश प्रदर्शित झाला.

स्थानिक नागरिकांनी याची माहिती मिळताच पोलिसांना कळवले. कळंगुट पोलीस स्थानक आणि हणजूण पोलीस स्थानकच्या पथकांनी तातडीने हस्तक्षेप करत या आस्थापनांचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले ( कळंगुट येथून ४ व हणजूण ३ जणांना )आणि पुढील गदारोळ टाळण्यासाठी एलईडी बोर्ड त्वरित बंद केले.
पोलिसांकडून कठोर कारवाई
या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बीएनएस (भारतीय न्याय संहिता) च्या कलम १५२ आणि ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६सी आणि ६६एफ अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.

हे संदेश जाणूनबुजून प्रदर्शित केले गेले की, कोणत्या तांत्रिक हॅकिंगमुळे (Technical Hack) हे घडले, याचा पोलीस तपास करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. या घटनेमुळे किनारपट्टी भागातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि सायबर गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.