गोव्यात विठ्ठल भक्तीचा महिमा वाढतोय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : गोव्यातील (Goa) मडगावातील श्री हरिमंदिर (Shri Hari Mandir) देवस्थानचा ११६ वा दिंडी महोत्सव (Dindi Festival) मोठ्या उत्साहात पार पडला. गेले काही दिवस असलेले पावसाळी वातावरण व दिंडीचा परमोच्च क्षण सुरू असताना पावसाने जोरदार बरसात केली. तरीही उत्साह कायम होता.

श्री हरिनामाच्या गजरात व श्री विठ्ठल भक्तीत मडगाव नगरी भरून गेली. दर्शनासाठी व दिंडीनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांनाही भाविकांची गर्दी होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, साबांखामंत्री दिंगबर कामत, साबांखामंत्री दिगंबर कामत, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार निलेश काब्राल, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, भाजप प्रदेश सचिव सर्वानंद भगत, सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्यासहीत मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेऊन दिंडीनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

पाजीफोंड येथील श्री हरि मंदिर देवस्थान परिसर, मडगाव नगरपालिका चौक, भारतीय स्टेट बॅंक परिसर ते कोंब येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत भक्तीचे वातावरण होते. श्री हरिमंदिरासमोरील व्यासपीठावर प्रमुख निमंत्रित गायक कलाकार स्वरांगी मराठे व राजयोग धुरी यांची पहिली गायन बैठक पार पडली.

त्यानंतर दुसरी व तिसरी गायन बैठक यूको बॅंकेजवळ झाली. वास्कोतील बाबू गडेकर संचलित श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथकासहीत धार्मिक ग्रंथासह उत्सवमूर्तीची स्थापना केलेल्या रथाची मिरवणूक श्री हरिमंदिराजवळून कोंब येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जाण्यासाठी निघाली.

भाजप प्रदेश अध्यक्ष यांच्या दामबाबाले घोडे संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिंडी पथक स्पर्धा पार पडली. त्यात गोव्यातील विविध दिंडी पथकांनी सहभाग घेऊन वातावरण भक्तीमय करून सोडले. शर्मद पै रायतूरकर यांच्या युव संजीवनीतर्फे आयोजित कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. नगरपालिका चौकात घालण्यात आलेली रांगोळी आकर्षण ठरली.
यावेळी माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, दिंडीला आता राज्यस्तरीय दर्जा मिळाला आहे. आगामी काळात यापेक्षा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा व्हावा. दिंडी पथक स्पर्धेत सहभागी पथकांचे सादरीकरण विठ्ठल भक्ती जागवणारे असून, पंढरपूरनंतर गोव्यातही विठ्ठल भक्तीचा महिमा वाढत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.