अधिकारी झाल्यानंतर गर्लफ्रेंडला टाटा; मारहाण आणि लैंगिक अत्याचाराच्या परस्पर तक्रारींनी खळबळ

पणजी : राजकुमार राव आणि कृती खरबंदा ‘शादी में जरूर आना’ ची पुनरावृत्ती झाली आहे. पण हे प्रकरण थोडे गंभीर वळणावर आहे. गोवा राज्य नागरी सेवेत कनिष्ठ श्रेणी अधिकारी (Junior Grade Officer in Goa State Civil Service) म्हणून नियुक्त झालेल्या एका अधिकाऱ्याने पद मिळाल्यानंतर पूर्वीच्या गर्लफ्रेंडला सोडून नवी मैत्रीण केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे.
या वैयक्तिक वादाने पोलिस ठाण्यापर्यंत मजल मारली असून दोघांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवतीने या अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करत गुन्हा नोंदविला आहे. त्याचबरोबर, अधिकाऱ्यानेही आपल्या बचावासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितले की, युवतीने कार्यालयात येऊन शिविगाळ आणि कुटुंबियांवर दगडफेक केली. या घटनांमुळे दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष तीव्र झाला असून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘शादी में जरूर आना’ (राजकुमार राव आणि कृति खरबंदा अभिनित) या चित्रपटाची आठवण होत आहे.
चित्रपटातील कथानकाप्रमाणेच येथेही अधिकारी झाल्यानंतर प्रेमसंबंध तुटले, मात्र गोव्यातील या वास्तव घटनेत ‘ट्विस्ट’ अधिक गंभीर स्वरूपाचा आहे कारण आता या प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराचे गुन्हे नोंद झाले आहेत.
राजकुमार राव आणि क्रिती खरबंदा यांचा ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट बराच गाजला होता. यात सत्येंद्र (राजकुमार) आणि आरती (कृती खरबंदा) यांच्यात असलेले प्रेमसंबंध आरती सरकारी अधिकारी झाल्यानंतर तुटतात. यात सत्तू मात्र प्रचंड दुखावतो.
या कथेत ट्वीस्ट येतो जेव्हा आरतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात आणि चौकशीसाठी सत्येंद्र येतो. अर्थात तोपर्यंत सत्येंद्र आरती पेक्षा मोठा अधिकारी होऊन परततो आणि धक्का देतो. गोव्यातल्या कथेत अधिकारी झाल्यानंतर सतेंद्रने आरतीशी काडीमोड घेतला आहे. पण यात ट्वीस्ट नाही.
कारण मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आणि गुन्हाही नोंद झाला. अधिकारी झालेल्या मुलाने मुलीच्या विरोधातही गुन्हा दाखल केला पण यात अधिकारी बनलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रीयकरावर गंभीर आरोप आहेत.
प्रेमातून वैराकडे गेलेल्या या ‘अधिकारी आणि एक्स-गर्लफ्रेंड’चा वाद सध्या गाजत आहे. राज्याच्या प्रशासनात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
तक्रारीत संबंधित अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पणजीतील महिला पोलीस स्थानकात नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तिसवाडी तालुक्यातील २४ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ वर्षीय नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकारी आणि पीडितेची १२ मार्च, २०२३ रोजी दक्षिण गोव्यात एका खासगी कार्यक्रमात ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.
एप्रिल २०२३ मध्ये त्या अधिकाऱ्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला युवतीने होकार दिला. दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या निर्णयाला हरकत घेतली नाही. लग्नाची बोलणी सुरू केली. मात्र नंतर दोघांचेही फिस्कटले. अधिकाऱ्याने ४ मे, २०२३ रोजी दक्षिण गोव्यातील त्याच्या फ्लॅटवर, तसेच ७ जून २०२५ रोजी अधिकाऱ्याच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तक्रारीत संबंधित अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ११५(२) आणि ३५२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यानंतर त्या दोघांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्येही वाद सुरू झाले. अधिकाऱ्याने तिला मारहाण केल्याचा आरोपही युवतीने केला आहे. आता अधिकाऱ्यानेही युवतीच्या कुटुंबियाविरोधात तक्रार दाखल केली ज्यानुसार गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.