बांबोळी येथे भीषण अपघातात दोघे ठार

मृतात ऑल इंडिया सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग, खेळाडू अंकित कुमार बलियान यांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
बांबोळी येथे भीषण अपघातात दोघे ठार

पणजी : गोव्यातील (Goa) पणजी मडगाव राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळील उतरणीवर टॅंकर आणि ‘रेंट अ कॅब’चा (Tanker And Rent A Cab) भीषण अपघात झाला. त्यात दोघे ठार झाले. अपघातात ठार झालेल्यांत  ऑल इंडिया सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग (Yogendra Singh) व खेळाडू अंकित कुमार बलियान यांचा समावेश आहे. या प्रकरणात जुने गोवा पोलिसांनी टँकर चालक राहुल सर्वदे याच्यावर गुन्हा नोंदवून घेतले ताब्यात घेतले.


अपघात एवढा भीषण होता की, टॅंकरची धडक दुभाजकाला बसल्यानंतर दुसऱ्या लेनमध्ये जाऊन ‘रेंट अ कॅब’ला बसली.  जुने गोवा पोलिसांनी (Goa Police) अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, टॅंकर बांबोळीहून पणजीच्या दिशेने जात होता. ‘रेंट अ कॅब’ पणजीहून बांबोळीच्या दिशेने येत होती. वरील ठिकाणी उतरणीवर टॅंकर चालकाच्या ताबा सुटला आणि टँकरची  धडक दुभाजकाला बसली.


त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाऊन ‘रेंट अ कॅब’ला धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला. टॅंकरचीही हानी झाली. दुभाजकाला लागून असलेला विजेचा खांबही कोसळला.


मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जुने गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखीली हवालदार चतुर सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला.

त्यानंतर  मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील शवागृहात ठेवण्यात आले. उपनिरीक्षक जसवीता नाईक अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा