ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अन्य दुचाकीने दिली होती धडक

मडगाव: मडगाव येथील रेल्वेस्थानकाजवळ रविवारी रात्री दुचाकींत अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. परशुराम उर्फ परश्या तलवार (वय ३८) असे या युवकाचे नाव आहे.
ओव्हरटेक करताना अपघात
रुमडामळ येथील रहिवासी असलेला परशुराम तलवार याचा अपघाती मृत्यू झाला. मडगाव खारेबांध येथून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेस्थानक परिसराजवळ हा अपघात घडला. आझादनगर येथून रुमडामळ येथे जात असताना, मागाहून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात परशुराम यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेमुळे परशुराम रस्त्यावर पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
परशुराम तलवार हे मडगाव पालिकेतील एका अभियंत्यांचे चालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, मडगाव पोलीस अपघात कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाचा शोध घेत आहेत.