मडगाव परिसरात यावर्षी डेंग्यूचा एकच रुग्ण

डॉ. मास्कारेन्हस : मलेरियाच्या रुग्णसंख्येत निम्म्याने घट


6 hours ago
मडगाव परिसरात यावर्षी डेंग्यूचा एकच रुग्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगाव आरोग्य केंद्राच्या परिक्षेत्रात यावर्षी साथरोगाबाबतच्या जागृतीमुळे साथरोगाच्या रुग्णांची संख्या कमी आहे. यावर्षी डेंग्यूचा केवळ एकच रुग्ण आढळून आला असून आठ डेंग्यूसदृश रुग्ण निरीक्षणाखाली आहेत.
मडगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. बाप्तिस्ता मास्कारेन्हस यांनी आरोग्य केंद्राच्या परिक्षेत्रातील साथरोगाबाबत माहिती देताना गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी रुग्णसंख्या कमी असल्याचे स्पष्ट केले. डॉ. मास्कारेन्हास यांनी सांगितले की, २०२५ या वर्षात आतापर्यंत केवळ एकच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे. आठ डेंग्यूची लक्षणे असलेले संशयित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ही सुधारणा लक्षणीय आहे. साथरोगाचे एकाच भागात अनेक रुग्ण आढळून आले, अशी स्थिती यावर्षी नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंतच्या माहितीनुसार मलेरियाच्या रुग्णसंख्येत निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. २०२५ वर्षात ४३ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ८३ रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण ते दुसर्‍या भागातून राज्यात आले होते.
सततच्या जागृती कार्यक्रमामुळे रुग्णसंख्येत घट
मडगाव व परिसरात पावसाच्या आधीपासून जागृतीपर कार्यक्रम केले जातात. सातत्याने जागरूकता केली जाते, चांगली स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते, तसेच डास नियंत्रण उपाययोजनांमुळे यावर्षी ही घट दिसून येत आहे, असे डॉ. मास्कारेन्हस यांनी स्पष्ट केले. पावसामुळे विविध भागात पाणी साचून डासउत्पत्ती होत असते. आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांकडून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लोकांना स्वच्छता राखण्यासह पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे साथरोग वाढण्याची शक्यता असते त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. मास्कारेन्हस यांनी केले.      

हेही वाचा