डिचोलीत व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
डिचोलीत व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

डिचोली: डिचोलीतील बगलमार्गावर (Bypass Road) शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात कर्नाटकमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. व्हाळशी जंक्शनजवळ (Valshi Junction) हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी उत्तर रात्री सुमारे दीड वाजता एक फोर्स ट्रॅक्स क्रूझर (Force Trax Cruiser) गाडी डिचोलीच्या बगलमार्गावरून वेगाने जात होती. व्हाळशी जंक्शनजवळ (पेन सर्कल) आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी भरकटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. 

जखमींची प्रकृती चिंताजनक

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि डिचोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जीपगाडीत अडकलेल्या तिन्ही जखमींना त्वरीत बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात गाडीत असलेल्या एकूण नऊ प्रवाशांपैकी तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तिन्ही जखमी व्यक्ती कर्नाटक राज्यातील रहिवासी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

डिचोली पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून अपघातामागचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे डिचोली बगलमार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

हेही वाचा