फोंडा पोटनिवडणूक : निवडणुकीची तारीख जाहीर नसतानाही भेटीगाठींसह मतदारांशी संपर्क सुरू

फोंडा : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी बैठका घेऊन उमेदवार आणि इतर बाबींवर निर्णय घेणार असल्याचे सांगितले असले तरी, इच्छुकांनी मात्र भेटीगाठीसह तयारीला वेग दिला आहे.राज्याचे कृषीमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. नियमानुसार, त्यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघात सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे. फोंडा पोटनिवडणुकीपूर्वी १३ डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीनंतर फोंडा पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंडा पोटनिवडणुकीसाठी योग्य वेळी पक्ष उमेदवार जाहीर करेल, असे सांगितले आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उमेदवार जाहीर करायला अजून वेळ असून, बैठका घेऊन उमेदवार निवडीची प्रक्रिया निश्चित केली जाईल आणि युतीबाबत इतर पक्षांशी चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगो) अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी रवी नाईक यांच्या निधनानंतर रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिल्यास बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मगोची भाजपसोबत युती असल्याने मगो भाजप उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही स्पष्ट केले आहे.

रितेश नाईक संभाव्य भाजप उमेदवार
दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असून, माझे काम सुरू अाहे. परंतु पक्षाने आदेश दिल्याशिवाय अधिकृतपणे निवडणुकीच्या तयारीचा प्रचार करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
इच्छुक उमेदवारांची तयारी

* डॉ. केतन भाटीकर (मगो) यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी मतदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली असून, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन फेऱ्या पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले. मगोने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून लढण्याची त्यांची तयारी आहे.
* राजेश वेरेकर (काँग्रेस) यांनी मागील वेळी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ते पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनीही कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासह तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची तारीख कधीही जाहीर झाली तरी त्यापूर्वी तयारी करणे योग्य ठरते," असे त्यांचे मत आहे.
* विश्वनाथ दळवी (भाजप) भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून, पक्षासाठी अनेक वर्षांपासून काम करत असल्याने आपला उमेदवारीवर दावा असल्याचे त्यांनी सांगितले.