कार मालकासह तिघांना अटक : कोलवाळ पोलिसांची कारवाई

म्हापसा : पिर्ण, बार्देश, येथील कपिल चौधरी (१९, रा. हातरस, उत्तर प्रदेश) या युवकाच्या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी गुरुदत्त सुभाष लवंदे (३१, कांदोळी), डायसन डोमिंगोस कुतिन्हो (३१, रा. उमतावाडा कळंगुट) व सूरज जोतीश ठाकूर (२१, वोर्डा कांदोळी) या तिघांना अटक केली आहे.
भाड्याने घेतलेली रेन्ट अ कॅब थार जीपगाडी चोरून नेण्याच्या संशयावरून संशयितांनी बांदा-सावंतवाडी येथे पकडून कपिलला जबर मारहाण केली. दंडूके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्याला थिवी टेकडीवर घटनास्थळी निर्जन अशा ठिकाणी टाकण्यात आले. कपिल दारूच्या नशेत मृत्यू पावल्याचे भासवण्यासाठी त्याच्या खिशात पाईंट बिअरची बाटली संशयितांनी घातली होती.
कपिल चौधरी याने रेंन्ट अ कॅब जीपगाडी भाड्याने घेताना दीपक ठाकूर नावाचे बनावट ओळखपत्र सादर केल्याचे पोलीस चौकशीतून उघडकीस आले आहे.
शुक्रवार, दि. ३१ रोजी कपिल चौधरी हा युवक केळ पिर्ण आणि खरगाळी, थिवी दरम्यानच्या टेकडीवर पठारी भागात निपचित पडलेला सापडला होता. १०८ रुग्णवाहिकेने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मृताच्या शरीरावर लाकडी दांडा, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाणीचे वण होते व त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले होते.
याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कॉल लोकेशन व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. शनिवार, दि. १ रोजी सकाळी रेन्ट अ कॅब व्यावसायिक संशयित गुरुदास लवंदे याला अटक केली. त्यानंतर सायंकाळी डायसन कुतिन्हो व सूरज ठाकूर या दोघा संशयितांना पोलिसांनी चौकशीअंती अटक केली. या खून प्रकरणात अजून काहींचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून आढळून आले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल चाैधरी यांनी गुरुदत्त लवंदे याच्याकडून ३० ऑक्टोबर रोजी रेन्ट अ कॅब असलेली जीए ०३ एएच ५२५४ क्रमांकाची थार जीपगाडी भाड्याने घेतली होती. दीपक ठाकूर नावाने असलेले पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून त्याने दिले होते. गोव्यात फिरण्यासाठी हवी असल्याचे सांगून ही गाडी त्याने घेतली होती.
भाड्याने दिलेली ही जीपगाडी गोव्याची सीमा पार करून बांदा-सावंतवाडी (महाराष्ट्र) येथे पोहोचल्याचे जीपीएस ट्रॅकरवर दिसून आले. आपली गाडी चोरून नेली जात असल्याचे लक्षात येताच संशयित गुरुदत्त लवंदे यांनी आपल्या मित्रांना सोबत घेतले आणि किया सेल्टोस कारने 'थार' जीपचा पाठलाग सुरू केला.
कुडाळ-कणकवली येथे संशयितांनी ही जीपगाडी अडवली. कपिल चौधरीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संशयितांनी त्याला तिथेच मारझोड केली. त्यानंतर त्याला थिवी टेकडीवरील केळ पिर्ण आणि खरगाळी दरम्यानच्या पठारी भागातील निर्जन ठिकाणी आणून पुन्हा जबर मारहाण केली.
शनिवार, दि. १ रोजी सकाळी रेंट अ कॅब व्यावसायिक संशयित गुरुदास लवंदे याला प्रथम ताब्यात घेऊन नंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी डायसन कुतिन्हो व सूरज ठाकूर या दोघा संशयितांना चौकशीअंती अटक करण्यात आली. या तिघांनीही खुनाची कबुली दिली आहे.
या खून प्रकरणात अजून काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून आढळून आले असून, पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर हे पुढील तपास करत आहेत आणि इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज, कॉल लोकेशनद्वारे छडा
या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह कॉल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला.
दारूच्या नशेत मृत्यूचा बनाव
जबर मारहाणीनंतर कपिलला रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले. कपिलचा दारूच्या नशेत मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी संशयितांनी एका दारूच्या दुकानातून एक पाईंट बिअरची बाटली घेतली आणि ती त्याच्या खिशात टाकून पळ काढला.