शेतकऱ्यांना लवकरच ४० हजार रु. हेक्टरी मदत

डिचोली : डिचोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात सुमारे ३८० हेक्टर क्षेत्रात शेतीची हानी झाली असून, ६९० हून अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.
डिचोली तालुक्यात शुक्रवारपासून तब्बल २०० मिमी पाऊस कोसळला, ज्यामुळे वाळवंटी नदीची पातळी पहाटे साडेतीन मीटरच्या वर गेली होती. डिचोली नदीनेही सुमारे साडेतीन मीटरची पातळी गाठल्याने सखल भागांत पाणी शिरले होते. साखळी नाल्यातील पाणी बाजारपेठेत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळीच पंपिंग सुरू केल्याने मोठा धोका टळला.
डिचोलीतील वाळवंटी आणि पार नदी दुथडी भरून वाहत आहे. अंजुणे धरणाची पाणी पातळी ९३ मीटरच्या वर वाढल्यामुळे धरणाचे चारही दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, शनिवार दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने आणि पाण्याचा विसर्ग नियंत्रित झाल्याने पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार, सरकार प्रति हेक्टरी ४० हजार रुपये या प्रमाणात मदत वितरित करणार आहे. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी स्पष्ट केले की, आगामी दोन दिवसांत कृषी अधिकारी गावात जाऊन सर्व कागदपत्रे गोळा करून नुकसानभरपाईचे अर्ज तयार करतील. डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत वितरित करण्याची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, साळ येथील मेघश्याम राऊत यांनी हेक्टरी ८० हजार रुपये मदत देण्याचे आवाहन केले आहे.