पुढील सहा दिवस तुरळक पावसाचा अंदाज

पणजी : यंदा राज्यात मान्सून हंगाम तसेच ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अंदाजातून ही माहिती मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
शनिवारी राज्यात तुरळक पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने २ ते ७ नोव्हेंबर दरम्यान किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या सहा दिवसांसाठी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. शनिवारी पणजीत कमाल ३१.४ अंश व किमान २४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २९.४ अंश व किमान तापमान २४.३ अंश सेल्सिअस राहिले.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३२ अंश, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राज्यात चोवीस तासांत सरासरी १.५३ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान धारबांदोडा येथे २.६० इंच, पेडणेमध्ये १.९४ इंच, दाबोळीत १.९३ इंच तर फोंडा येथे १.७७ इंच पावसाची नोंद झाली. एकंदरीत, गोव्यात सध्या पावसाळी हवामान सुरू असून, नोव्हेंबरमध्येही ते कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
ऑक्टोबरमध्ये विक्रमी पाऊस
राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाची आकडेवारीही हवामान खात्याने जारी केली आहे. राज्यात १ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान सरासरी १६.१४ इंच पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान पेडणे येथे २१.५३ इंच, धारबांदोडा येथे २०.९३ इंच पाऊस पडला आहे.