शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल

पणजी : रविवारपासून पावसाने उसंत घेतली असली तरी शनिवारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यात शेतीच्या नुकसानीचे प्रमाण २ हजार हेक्टरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज आहे.
नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी सुरू आहे, त्यानंतरच नेमक्या नुकसानीचा आकडा कळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.
मेणकुरे-साळ भागात ३८० हेक्टर शेतीचे नुकसान
केवळ मेणकुरे आणि साळ या भागात ३८० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पेडणे तालुक्यात २०० हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. काणकोण, सांगे, सासष्टी, धारबांदोडा, बार्देश, फोंडा या सर्व तालुक्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार, नुकसानीचा आकडा सहज २ हजार हेक्टरपेक्षा जास्त होईल.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले की, सरकारने देऊ केलेली रक्कम खूपच कमी आहे. मजुरीमुळे शेती करणे आता परवडणारे नाही. नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी करणार आहे. मात्र, संपूर्ण नुकसान भरपाई देणे सरकारला शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुडतरीचे आमदार अालेक्स रेजिनाल्ड यांनीही हेक्टरी ४० हजारांपेक्षा जास्त भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, डिचोली विभागीय कार्यालयात ६९० हून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. सर्व कार्यालयांमध्ये अर्ज येत असल्याने, भात लावणी करणाऱ्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकरी हेक्टरी ४० हजारांच्या मदतीवर असंतुष्ट
सध्या सरकारने हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या रकमेवर शेतकरी समाधानी नाहीत. नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हेक्टरी ४० हजार प्रमाणे जास्तीत जास्त ४ हेक्टरपर्यंत भरपाई देण्याची तरतूद आहे, त्यामुळे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त १ लाख ६० हजार रुपये मिळू शकतील.