डिचोलीचा प्रसिद्ध ‘नवा सोमवार’ २४ नोव्हेंबरला

भव्य पालखी मिरवणूक : ग्रामस्थ गावकर मंडळाकडून पत्रकार परिषदेत कार्यक्रमांची घोषणा


6 hours ago
डिचोलीचा प्रसिद्ध ‘नवा सोमवार’ २४ नोव्हेंबरला

पत्रकार परिषदेत माहिती देताना ग्रामस्थ गांवकर मंडळ डिचोलीचे अध्यक्ष राकेश गावकर. सोबत श्याम गावकर, दर्शन परब व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळ, गावकरवाडा-डिचोलीतर्फे ‘नवा सोमवार’ उत्सव २४ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नामवंत गायकांच्या मैफली तसेच विविध, धार्मिक, स्पर्धात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामस्थ गावकर मंडळाचे अध्यक्ष राकेश गावकर, सचिव शामू गावकर, खजिनदार दर्शन परब व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी समितीचे नारायण गावकर, रामा गावकर, आशिष गावकर, गुरुदास गावकर, गजानन परब, सतीश परब, ऋषिकेश गावकर आदी उपस्थित होते. गावकरवाडा डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात यानिमित्त सकाळपासून महाअभिषेक, लघुरुद्र, आरती, तीर्थप्रसाद होईल. त्यानंतर भाविकांना देवीची सेवा करता येईल. रात्री श्री शांतादुर्गा देवीला गाऱ्हाणे घालून जयघोषात पालखी मिरवणूक काढण्यात येईल. विठ्ठल रखुमाई वारकरी मंडळ, तेरसे बाबर्डे यांची दिंडी, तसेच हनुमान बँड पथक बाणस्तारी पालखी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पालखी मंदिरात प्रवेश केल्यानंतर पहाटे आरती, तीर्थप्रसाद व सांगणे होऊन उत्सवाची सांगता होईल.
यानिमित्त कोमुनिदाद सभा मंडपात राज्यस्तरीय व डिचोली नगरपालिका मर्यादित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थ गांवकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.
गायकांच्या मैफली
रात्री १० वा. श्री शांतादुर्गेच्या प्रांगणात ‘हृदयाच्या तालावर’ हा अभंग, भक्तीगीत, नाट्यगीत, भावगीत, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यात सुप्रसिद्ध गायक राजयोग धुरी, गायिका शमिका भिडे (मुंबई) गायन सादर करतील. डॉ. गोविंद भगत निवेदन करतील. दुसरी बैठक रात्री १.३० वा. श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात ‘इंद्रायणी काठी’ अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध गायक ओम बोंगाणे (सारेगम फेम व उस्ताद रशीद खान यांचे शिष्य) गायन सादर करतील. अक्षय सातार्डेकर निवेदन करतील.

हेही वाचा