रत्नागिरीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय सन्मान
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
रत्नागिरी : रत्नागिरी (महाराष्ट्र) येथील मूळ रहिवासी आणि अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना, चॅपल हिल येथे संगणक विज्ञान शाखेची चौथ्या वर्षाची डॉक्टरेट (पीएचडी) विद्यार्थिनी वैदेही पाटील यांना ‘गूगल पीएचडी फेलोशिप २०२५’ प्रदान करण्यात आली आहे. ही फेलोशिप त्यांना मशीन लर्निंग आणि एमएल फाउंडेशन्स या क्षेत्रातील संशोधनासाठी मिळाली आहे.
‘गूगल पीएचडी फेलोशिप’ ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती संगणक विज्ञान किंवा त्यासंबंधित क्षेत्रात डॉक्टरेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. दोन वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या या फेलोशिप अंतर्गत पाटील यांना दरवर्षी सुमारे ८५ हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक मदत शिक्षण, राहणीमान, प्रवास आणि संशोधन उपकरणांसाठी मिळणार आहे. तसेच गूगल संशोधन मार्गदर्शकांसोबत थेट काम करण्याची संधीही मिळेल.
या वर्षी गूगलने एकूण ३५ देशांतील २५५ विद्यार्थ्यांना आणि १२ संशोधन क्षेत्रांमध्ये ही फेलोशिप दिली आहे. विज्ञान क्षेत्रातील नवे शोध आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणाऱ्या संशोधकांचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
वैदेही पाटील यांचे संशोधन डीप लर्निंग मॉडेल्स अधिक सुरक्षित आणि जबाबदार बनवण्यावर केंद्रित आहे. त्या मोठ्या भाषा मॉडेल्स मल्टिमोडल सिस्टीम्स आणि मल्टी-एजंट नेटवर्क्समध्ये गोपनीयता, सुरक्षा आणि नैतिक जबाबदारी यांचा समन्वय साधण्याचे काम करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन प्रो. मोहित बन्सल करत असून त्या मल्टिमोडल अंडरस्टँडिंग, रिझनिंग अँड जनरेशन फॉर लँग्वेज लॅब आणि यूएनसी-एआय समूहाशी संलग्न आहेत.
डॉक्टरेट अभ्यासक्रमापूर्वी वैदेही यांनी आयआयटी मुंबई येथून विद्युत अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्समध्ये एम.टेक. पदवी मिळवली आहे. त्यांनी अॅडोब रिसर्च, अमॅझोन एजीआय लॅब्स आणि अॅपल या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये इंटर्नशिपही केली आहे.