फोंडा नगराध्यक्ष नाईक यांचा राजीनामा, ढवळीकर बनतील नवे नगराध्यक्ष

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
फोंडा नगराध्यक्ष नाईक यांचा राजीनामा, ढवळीकर बनतील नवे नगराध्यक्ष

फोंडा :  अलिखित करारानुसार फोंडा नगरपालिकेचे (Ponda Muncipality) नगराध्यक्ष आनंद नाईक (Chairperson Anand NaiK)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. भाजपचेच (BJP) वीरेंद्र ढवळीकर यांची नवे नगराध्यक्ष म्हणून वर्णी लागणार आहे.

 सविस्तर वृत्तानुसार 2023 मध्ये ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी नगराध्यक्ष पद हे विभागून देण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीला रितेश नाईक हे नगराध्यक्ष बनले.

दुसरे नगराध्यक्ष म्हणून विश्वनाथ दळवी यांचे नाव सुचविण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपल्या ऐवजी वीरेंद्र ढवळीकर यांना नगराध्यक्ष करण्याची विनंती केली. परंतु रितेश नाईक यांच्यानंतर आनंद नाईक यांनी सुद्धा नगराध्यक्ष होण्यासाठी आपली दावेदारी ठोकली.

स्व. रवी नाईक यांनी सुद्धा आनंद नाईक यांच्या नावाला पसंती दिल्याने शेवटी हा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला. कोणीच माघार घेत नाहीत ते पाहून तिथे चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यावेळी आनंद नाईक यांना चिट्याद्वारे नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली.

 जुलै 2025 मध्ये आनंद नाईक यांचा कार्यकाळ संपला होता. परंतु ते राजीनामा देण्यासाठी टाळाटाळ करत होते. शेवटी भाजपमध्येच बंड होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचे सुतोवाच केले.

मात्र त्यासाठी एक अट घातली. नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतरच राजीनामा देणार असे त्यांनी सांगितले. पंधरा दिवसापूर्वी नव्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. शुक्रवारी त्यांनी आपला राजीनामा नगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला.


हेही वाचा