अध्यक्ष आणि इतर सदस्यांची पदे भरण्यासाठी मागवले अर्ज.

पणजी : तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गोवा सरकारने अखेर गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (Goa State Commission for Protection of Child Rights - GSCPCR) नवीन समितीला मान्यता दिली आहे. या नवीन समितीमधील अध्यक्ष आणि इतर सदस्यांची पदे भरण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. या नवीन समितीचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असेल, अशी माहिती महिला आणि बाल विकास संचालनालयाने दिली आहे.
दोन वर्षे आयोग होता निष्क्रिय
आयोगाचे यापूर्वीचे अध्यक्ष पीटर बॉर्जेस यांच्या नेतृत्वाखालील समितीचा कार्यकाळ १९ मे २०२४ रोजी संपला आणि ती बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून या समितीला अध्यक्ष आणि सदस्य नसल्यामुळे हा आयोग पूर्णपणे निष्क्रिय झाला होता. बॉर्जेस यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन समिती निवडण्याची प्रक्रिया सरकारने दोन वर्षे प्रलंबित ठेवली होती.
पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
आता नवीन समिती निवडण्यास सरकारने मान्यता दिल्यानंतर, महिला आणि बाल विकास विभागाने बाल हक्क संरक्षण आयोग कायदा, २००५ च्या कलम १७ अंतर्गत स्थापन केलेल्या या आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदांसाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवले आहेत.
पदांसाठी पात्रता निकष
१. अध्यक्ष पद:
इच्छुक उमेदवार प्रतिष्ठित असावा आणि त्याने मुलांच्या कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य केलेले असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
२. सदस्य पद:
इच्छुक उमेदवार प्रतिष्ठित, सक्षम, प्रामाणिक आणि उत्कृष्ट दर्जाचा असावा. त्या व्यक्तीला शिक्षण, मुलांचे आरोग्य, काळजी, कल्याण किंवा विकास, बाल न्याय, दुर्लक्षित/अपंग मुलांची काळजी, बालकामगार निर्मूलन किंवा मुलांशी संबंधित कायद्यांच्या क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत
पात्र इच्छुकांनी अर्ज सादर करून, तो अर्ज संचालक, महिला आणि बाल विकास संचालनालय, दुसरा मजला, जुने शिक्षण इमारत, १८ जून रोड, पणजी, गोवा येथे २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पाठवायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केले जातील, असे महिला आणि बाल विकास संचालकांनी स्पष्ट केले आहे.