परवानाही रद्द होऊ शकतो

गोवा : पर्यटकांचा (Tourism) जीव धोक्यात घालून चालत असलेल्या हवाई खेळांसाठी राज्य सरकारने कडक नियम केले आहेत. नियम मोडल्यास २ लाखा पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. उपकरणे जप्त करण्याबरोबरच परवानाही रद्द होऊ शकतो. ऑपरेटर्सना पायलट व प्रवाशाला किमान १५ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पर्यटन विभागाने (Goa Tourism) यासंदर्भात नवीन ‘गोवा एअरो स्पोर्ट्स नियम, २०२५’ (Goa Aero Sports Rules, 2025) अधुसूचित केले आहेत. त्यात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडाची तरतुद करण्यात आली आहे. त्यात गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार व पुनरावृत्ती झाल्यास २ लाख रुपयांपर्यंत दंड, कायमचे काळ्या यादीत टाकणे, उपकरणे जप्त करणे व नोंदणी किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार, ऑपरेटर्सना पर्यटन विभागाकडे नोंदणी करणे आणि ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी वैध नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. निर्धारित शुल्क प्रति विमान १ लाख रुपये, प्रति हंगाम (ऑक्टोबर ते ३१ मे) प्रति ‘टँडम पायलट’ १०,००० रुपये, प्रत्येकी परदेशी पायलटसाठी २,५०० रुपये आणि भारतीय पायलट १,००० रुपये आहे. चार महिन्यांसाठी वैध आहे.
आवश्यक उड्डाण तासांसह केवळ प्रशिक्षित आणि परवानाधारक ‘टँडम पायलट’ना व्यावसायिकरित्या काम करण्याची परवानगी दिली जाईल. अपघात झाल्यास वैद्यकीय किंवा बचाव खर्चाच्या जबाबदारीतून राज्य सरकारला मुक्त करण्यासाठी ऑपरेटरना नुकसानभरपाई बॉन्ड भरणे देखील आवश्यक आहे.
हवाई क्रीडा क्षेत्रात अलिकडे काही अपघात घडले होते. त्यात बळीही गेले होते. त्यासाठी सुरक्षेच्या कारणांवरून ही नवी नियमावली करण्यात आली आहे.
अपघातांत दोघांचा मृत्यू
जानेवारी, २०२५ मध्ये केरी पठारावर झालेल्या एका घातक पॅरासेलिंग अपघातात पुण्यातील एका पर्यटकाचा आणि तिच्या नेपाळी प्रशिक्षकाचा पॅरासेल कोसळल्याने मृत्यू झाला होता.
वार्का येथे हल्लीच एका पॅरासेलिंग पॅराशूट माडात अडकले होते. यापूर्वीही काही अपघात घडले आहेत. त्यासाठी ही नवी नियमावली करण्यात आली आहे. त्यात प्रवासी व पायलटांच्या सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला आहे.