डिचोलीत अवकाळी पावसाचा कहर; सुमारे ३८० हेक्टर भातशेतीचे नुकसान, ६९० शेतकऱ्यांना फटका

अंजुणे धरणाचे दरवाजे उघडले, उद्भवली पूरसदृश्य स्थिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
डिचोलीत अवकाळी पावसाचा कहर; सुमारे ३८० हेक्टर भातशेतीचे नुकसान, ६९० शेतकऱ्यांना फटका

डिचोली : डिचोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गेल्या काही दिवसांत रौद्ररूप धारण केले. यामुळे डिचोलीतील वाळवंटी आणि पार नद्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि जलसंपदा खात्याची धावपळ उडाली. अंजुणे धरणाची पाणी पातळी ९३ मीटरच्या वर वाढल्यामुळे धरणाचे चारही दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, शनिवार दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने आणि पाण्याचा विसर्ग नियंत्रित झाल्याने पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ

डिचोली तालुक्यात कालपासून तब्बल २०० मिमी पाऊस कोसळला, ज्यामुळे वाळवंटी नदीची पातळी पहाटे साडेतीन मीटरच्या वर गेली होती. डिचोली नदीनेही सुमारे साडेतीन मीटरची पातळी गाठल्याने सखल भागांत पाणी शिरले होते. साखळी नाल्यातील पाणी बाजारपेठेत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळीच पंपिंग सुरू केल्याने मोठा धोका टळला.




आमठाणे धरणही तुडुंब भरले असून, पाण्याची पातळी ४९ मीटरपर्यंत पोहोचली आहे. अतिरिक्त पाण्याचा विसर्ग लवकरच होण्याची शक्यता आहे. वीज खांब कोसळणे आणि रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदत कार्य करून अडथळे दूर केले.


भातशेतीचे मोठे नुकसान; २ कोटींचा प्राथमिक अंदाज

या पुराने डिचोली तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी कृषी संचालक संदीप फळदेसाई आणि कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत साळ, मेण, कुरे, धुमाशे, मुळगाव आदी परिसरातील शेतीची पाहणी केली. तालुक्यात सुमारे ३८० हेक्टर क्षेत्रात शेतीची हानी झाली असून, ६९० हून अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.




नुकसानीचा प्राथमिक अंदाज अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.

शेतकऱ्यांना तातडीची मदत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार, सरकार प्रति हेक्टरी ४० हजार रुपये या प्रमाणात मदत वितरित करणार आहे. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी स्पष्ट केले की, आगामी दोन दिवसांत कृषी अधिकारी गावात जाऊन सर्व कागदपत्रे गोळा करून नुकसानभरपाईचे अर्ज तयार करतील. डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत वितरित करण्याची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, साळ येथील मेघश्याम राऊत यांनी हेक्टरी ८० हजार रुपये मदत देण्याचे आवाहन केले आहे.




मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासोबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि जलसंपदा खात्याला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, मामलेदार शैलेंद्र देसाई यांनी तलाठ्यांकरवी नुकसानीचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा